Last Updated on 18 Feb 2026 7:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट चित्ता’ला मोठे यश मिळाले असून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात गामिनी या मादी चित्त्याने तीन गोंडस बछड्यांना जन्म दिला आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात चित्ते आणल्याच्या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच ही गोड बातमी समोर आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव यांनी सोशल मीडियाद्वारे हा आनंद व्यक्त केला असून, आता या नव्या पाहुण्यांच्या आगमनाने देशातील एकूण चित्त्यांची संख्या आता ३८ झाली असून, भारताचा हा चित्ता पुनरुज्जीवनाचा प्रवास अधिक समर्थपणे पुढे जात आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंदर यादव यांनी कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्याच्या तीन पिलांचा जन्म झाल्याचे आज जाहीर केले.
गामिनी या दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या मादी चित्त्याने पिलांना जन्म दिल्याचे यादव यांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे. दक्षिण अफ्रिकेतून भारतात चित्ते आणल्याच्या घटनेला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पिलांचा जन्म झाला आहे.
भारतीय भूमीवर यशस्वीपणे जन्म घेतलेल्या चित्त्याच्या नवव्या पिलाची जन्म नोंद झाली आहे. भारतात जन्म झालेल्या आणि जिवंत असलेल्या बछड्यांची संख्या आता २७ झाली आहे. या तीन बछड्यांच्या जन्मानंतर चित्त्यांची भारतातील एकूण संख्या ३८ झाली आहे.
प्रत्येक पिलाच्या यशस्वी जन्मामुळे प्रोजेक्ट चित्ताला बळकटी येत आहे. या प्रकल्पात सहभागी असलेले पशुवैद्यक पथक व कर्मचारी यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चिकाटी याचेच हे फलित आहे असे मंत्री यादव म्हणाले.
“कुनोसाठी, भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. गामिनी व तिची तिन्ही पिल्ले यांची चांगली वाढ होऊन ते देशाच्या चित्ता पुनरुज्जीवनाचा प्रवास वेगाने व समर्थपणे पुढे सुरू ठेवतील,” असे यादव म्हणाले.
2022-23 मध्ये नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतून २० चित्ते यशस्वीरित्या भारतात आणले गेले. मांसभक्षक प्राण्यांचे आंतर खंडीय स्थलांतर करण्याची जगातील ही पहिलीच घटना होती.
17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या आठ चित्त्यांना भारतातल्या अभयारण्यात सोडण्यात आले होते.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Apr 2026 9:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit Manifestation : आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात प्रत्येकजण यशाच्या मागे धावत आहे. कष्टाला पर्याय नाही हे खरे असले,... Read more













































































