Last Updated on 17 Feb 2026 8:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा ।
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या ३२ विविध कल्याणकारी योजनांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे समोर आले आहे.अनधिकृत संघटना, संस्था आणि दलालांमार्फत कामगारांची आर्थिक पिळवणूक केली जात असून, या पार्श्वभूमीवर सातारा कामगार आयुक्तालयाने कामगारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मंडळामार्फत सक्रिय बांधकाम कामगारांसाठी शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य अशा विविध योजना राबवल्या जातात. या सर्व योजना पूर्णपणे निःशुल्क (Free) असून, अनुदानाची रक्कम थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, काही एजंट आणि अनधिकृत संस्था कामगारांना लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने पैसे उकळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
फसवणूक झाल्यास येथे संपर्क साधा : जर कोणत्याही दलालाने किंवा संस्थेने पैशांची मागणी केली किंवा फसवणूक केली, तर कामगारांनी खालील पत्त्यावर तात्काळ संपर्क साधावा:
पत्ता: सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, १५/१/अ/१, केशव सोना कॉम्प्लेक्स, रविवार पेठ, सातारा.
दूरध्वनी: ०२१६२-२३३०८४
ई-मेल: aclsatara@gmail.com
कामगार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, पात्र लाभार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या दलाल आणि एजंटवर दक्षता पथकामार्फत (Vigilance Team) कठोर कारवाई केली जाईल.








































































