Last Updated on 03 Feb 2026 7:26 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे ।
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या हृदयद्रावक दुर्घटनेत अजित पवारांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांसह या विमानात असलेल्या ५ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिली आहे.
अजित पवार हे आज सकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे येत होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा हे सभेसाठी बारामतीला येण्यासाठी निघाले होते. मात्र बारामतीत पोहोचल्यानंतर विमान लँड होत असताना ते कोसळले. या अपघातात अजित पवारांसह इतर तीन जणांचा मृत्यू झाला. विमान अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह इतर जखमींना बारामतीतील रुग्णालयातच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होते. परंतु तत्पूर्वीच त्यांच्या प्राणज्योत मालवली होती
सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले. विमान कोसळताच त्याने काही सेकंदातच भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि जळून खाक झाले. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उठू लागले. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने राज्यभरातून शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, विरोधी पक्षातील नेते तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व सहकारी संस्थांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, प्रशासकीय अनुभव आणि आर्थिक शिस्तीवर भर देणाऱ्या कार्यशैलीची आठवण काढली.












































































