Last Updated on 20 Jan 2026 6:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
ईश्वरपूर येथील निशिकांतदादा स्पोर्ट्स फौंडेशनच्या वतीने आयोजित निशिकांतदादा राज्यस्तरीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी चुरशीच्या आणि वेगवान सामन्यांमुळे थरारक सामन्यांमुळे क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई पोलीस, महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर, कोल्हापूर पोलीस, सातारा जिल्हा हॉकी असोसिएशन फलटण तसेच निशिकांतदादा स्पोर्ट्स ‘अ’ संघांनी आपापले सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
दिवसातील पहिल्या सामन्यात मुंबई पोलीस मुंबई संघाने अजित भैय्या स्पोर्ट्स ईश्वरपूर संघावर १-० अशी मात केली. सामन्याच्या २९व्या मिनिटाला रोहन पवार याने निर्णायक गोल नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. रोहन पवार याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या विजयासह मुंबई पोलीस संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली.
दुसऱ्या सामन्यात तिरंगा स्पोर्ट्स नूल संघाने शाहू स्पोर्ट्स कोल्हापूर संघाचा २-० असा पराभव केला. रितेश मांगले याने तिसऱ्या आणि आठव्या मिनिटाला दोन गोल करत सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले आणि तिरंगा स्पोर्ट्सने उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्र क्रीडामंडळ कोल्हापूर संघाने एसआरपी पुणे संघावर २-० असा विजय मिळवला. पृथ्वीराज साळुंखे (३४वे मिनिट) आणि अनिरुद्ध पाटील (४७वे मिनिट) यांनी गोल नोंदवले. गोलकिपर अमर पार्लेकर याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. या विजयासह कोल्हापूर संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
चौथ्या सामन्यात कोल्हापूर पोलीस संघाने वडगाव हॉकी अकादमी संघावर १-० अशी मात केली. १४व्या मिनिटाला विनोद मनुगडे याने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत संघाचा विजय निश्चित केला. विनोद मनुगडे यालाच सामनावीर घोषित करण्यात आले आणि कोल्हापूर पोलीस संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला.
पाचव्या सामन्यात सातारा जिल्हा हॉकी असोसिएशन फलटण संघाने अजित भैय्या स्पोर्ट्स ईश्वरपूर संघाचा ३-१ असा पराभव केला. अनिकेत आडगुळे याने २०, ३० आणि ३३व्या मिनिटाला हॅट्ट्रिक गोल नोंदवत सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. अजित भैय्या स्पोर्ट्सकडून दिग्विजय जाधव याने एकमेव गोल केला. अनिकेत आडगुळे याला ‘मॅन ऑफ द मॅच’ देण्यात आला. या विजयासह फलटण संघानेही उपांत्यपूर्व फेरी गाठली.
दिवसाच्या शेवटच्या सामन्यात निशिकांतदादा स्पोर्ट्स ‘अ’ संघने तिरंगा स्पोर्ट्स नूल संघावर ३-१ असा विजय मिळवत प्रेक्षकांचे लक्ष वेधले. विठ्ठल तेली (३रा मिनिट), अक्षय पवार (३२रा मिनिट) आणि गणेश बिराजदार (४६वा मिनिट) यांनी गोल नोंदवले. तिरंगा स्पोर्ट्सकडून निरंजन गोविलकर याने गोल केला. सामनावीर म्हणून निरंजन गोविलकर याची निवड करण्यात आली. या विजयासह निशिकांतदादा स्पोर्ट्स ‘अ’ संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला.
स्पर्धेत पंच म्हणून विजय पाटील, मनोज कोरे, प्रशांत निवळे, राहुल गावडे, टेक्निकल पंच रमेश उत्तेकर व विजय जाधव यांनी जबाबदारी पार पाडली.
माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, उद्योजक संजय बिंदगे, डॉ. प्रदीप पाटील, उमेश जाधव, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब घस्ते तसेच विविध दैनिकांचे पत्रकार, उद्योजक तसेच मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
दुसऱ्या दिवसातील सामन्यांनंतर अनेक बलाढ्य संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्याने स्पर्धेची उत्कंठा आणखी वाढली असून पुढील लढतींकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.












































































