Last Updated on 19 Jan 2026 7:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूरमध्ये निशिकांतदादा राज्यस्तरीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेचा थरार; पहिल्या दिवशी सहा सामन्यांत रंगली लढत
सांगली ।
निशिकांतदादा स्पोर्ट्स फौंडेशनच्या वतीने आयोजित निशिकांतदादा सुवर्ण चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेला उरुण ईश्वरपूर येथे उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सहा सामने खेळवण्यात आले असून अनेक चुरशीच्या लढतींमध्ये नामवंत संघांनी आपली ताकद दाखवून दिली.
पहिल्या सामन्यात पेठवडगांव हॉकी असोसिएशन संघाने निशिकांतदादा स्पोर्ट्स (ब) संघावर १–० असा निसटता विजय मिळवला. सामन्याच्या २१व्या मिनिटाला सौरभ सुतारने निर्णायक गोल नोंदवला. उत्कृष्ट खेळासाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र क्रीडा मंडळ, कोल्हापूर संघाने छावा स्पोर्ट्स, कोल्हापूर संघावर ४–० अशी एकतर्फी मात केली. अक्षय खोतने ९ व्या व १४ व्या मिनिटाला दोन गोल केले, तर तन्मय जाधव व सागर पवळकर यांनी उर्वरित गोल नोंदवले. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार अक्षय खोतला देण्यात आला.
तिसऱ्या सामन्यात मुंबई पोलिस संघाने सातारा जिल्हा हॉकी असोसिएशन, फलटण संघावर २–० असा विजय मिळवला. ४थ्या मिनिटाला सुनील शिपुरे व २८ व्या मिनिटाला अनिस मुंढे यांनी गोल केले. पराभव असूनही उत्कृष्ट गोलरक्षणासाठी फलटणच्या गोलकिपर अर्थव पवारला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
चौथ्या सामन्यात निशिकांतदादा स्पोर्ट्स (अ) संघाने शाहू फौंडेशन, कोल्हापूर संघावर ३–० अशी सरशी मिळवली. सुशील पवारने ८ व्या मिनिटाला तर विठ्ठल तेलीने २० व्या व ५६ व्या मिनिटाला दोन गोल नोंदवले. शाहू फौंडेशनकडील प्रथमेश पाटील याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
पाचव्या सामन्यात कोल्हापूर पोलिस संघाने निशिकांतदादा स्पोर्ट्स (ब) संघावर २–० असा विजय मिळवला. श्रीधर सुतार (३रा मिनिट) व ओमकार कावरे (३० वा मिनिट) यांनी गोल केले. निशिकांतदादा स्पोर्ट्सकडील समर्थ जाधव याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला.
दिवसाच्या शेवटच्या सामन्यात एसआरपीएफ, पुणे संघाने छावा स्पोर्ट्स, कोल्हापूर संघावर २–१ असा थरारक विजय मिळवला. कुशल यादवने ३ऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. छावाच्या महादेव तोरसकरने ३२ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर बरोबरी साधली; मात्र ५९व्या मिनिटाला श्रीकांत कलोटीने निर्णायक गोल करत एसआरपीएफला विजय मिळवून दिला. छावा स्पोर्ट्सच्या गोलकिपर अभिजीत विचारे याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
या सामन्यांसाठी पंच म्हणून विजय पाटील, मनोज कोरे, प्रशांत निवळे, राहुल गावडे यांनी काम पाहिले, तर तांत्रिक पंच म्हणून रमेश उत्तेकर व विजय जाधव यांनी जबाबदारी पार पाडली.












































































