Last Updated on 18 Jan 2026 10:24 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
भाषण करणारे अनेक असतात; पण भाषण जिवंत करणारे क्वचितच. बॅरिस्टर नाथ पै हे अशाच दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच भाषांमध्ये ते सहज भाषणे करीत. भाषा त्यांच्या हातातील साधन नव्हती, तर विचार पोहोचवण्याचं प्रभावी अस्त्र होती.
नानासाहेब गोरे यांनी अत्यंत समर्पक शब्दांत म्हटले आहे. “नाथ यांची लावण्यवती वाणी सात शृंगार करून व्यासपीठावर उभी राहिली की सभा दंग होई.” हे केवळ कौतुक नव्हे, तर त्यांच्या वक्तृत्वाचं अचूक वर्णन होतं.
नाथ पै बोलताना हातात पत्रे, वृत्तपत्रांच्या कात्रणांसह व्यासपीठावर उभे राहत. त्यांच्या भाषणाला संदर्भांची, पुराव्यांची आणि अभ्यासाची मजबूत बैठक असे. आचार्य अत्रे, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या अचूक नकला करत ते सभागृहात हास्याची लाट उठवत, पण त्या हास्यामागे नेमका मुद्दा असायचा—राजकीय, सामाजिक किंवा घटनात्मक.
ते भाषण ठरावीक एका तासातच संपवत. वेळेचा आदर हा त्यांच्या सार्वजनिक शिस्तीचा भाग होता. “श्रोत्यांचे आशीर्वाद हेच माझ्या सार्वजनिक जीवनातील शस्त्र आहे,” हा त्यांचा ठाम विश्वास होता. कदाचित म्हणूनच त्यांची भाषणे कधी पोकळ वाटली नाहीत.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कोकणचे प्रश्न, घटनादुरुस्ती या सर्व विषयांवर ते संसदेत आणि संसदेबाहेरही तितक्याच आग्रहीपणे उभे राहिले. जनतंत्र हे सुजनतंत्र व्हावे, यासाठी त्यांनी केवळ भाषणं केली नाहीत, तर कृतीची जोड दिली. त्यांच्या शब्दांना कृतीचं तारण होतं म्हणूनच ते विश्वासार्ह ठरत.
लोकशाहीचा धर्म त्यांनी अवघड संकल्पनांत नव्हे, तर सामान्य माणसाला समजतील अशा सोप्या शब्दांत सांगितला. त्यांच्या वक्तृत्वाने पंडित नेहरूंसारखे नेतेही प्रभावित झाले, ही गोष्ट त्यांच्या प्रभावाची साक्ष देते.
त्यांचे मित्र वासुदेव देशपांडे यांनी ‘लोकशाहीचा कैवारी’ आणि ‘लोकशाहीची आराधना’ या पुस्तकांत नाथ पै यांच्या वक्तृत्व शैलीचा सविस्तर मागोवा घेतला आहे. स्वतः नाथ पै म्हणतात…
“चांगल्या आवाजाची देणगी ही ईश्वरी कृपा आहे. विषयाशी एकरूप झाल्यावर शब्द शोधावे लागत नाहीत. मी केवळ तोंडाने बोलत नाही; माझा प्रत्येक अवयव बोलतो.”
देहभान हरपून, पूर्णतः विचारात विलीन होऊन ते बोलत. म्हणूनच एक तासाच्या भाषणानंतर ते घामाघुम होऊन थकलेले असत. ते थकवा नव्हता; ती होती विचारांची किंमत.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रभावी वक्तृत्वाने नावलौकिक मिळवणाऱ्या बॅरिस्टर नाथ पै यांचे बोलणे आजही भावी पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरेल. कारण त्यांचे वक्तृत्व हे केवळ भाषेचं नव्हे, तर लोकशाहीच्या आत्म्याचं प्रतिनिधित्व होतं.
![]()
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर
![]()













































































