Last Updated on 13 Jan 2026 3:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मोजणी प्रकरणांतील विलंब व तक्रारी रोखण्यासाठी भूमि अभिलेख विभागाचे परिपत्रक
नांदेड |
जमीन मोजणी प्रकरणांमध्ये अर्जदारांना वेळेत, पारदर्शक आणि अचूक सेवा मिळावी यासाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी आणि त्याच वेळेस संबंधित गट किंवा सर्वे नंबरच्या सर्व हद्दीच्या खुणा जागेवर निश्चित करून दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे स्पष्ट निर्देश जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक श्रीमती सीमा देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
भूमि अभिलेख विभागामार्फत होणाऱ्या मोजणी कामांमध्ये पारदर्शकता, अचूकता आणि गुणवत्ता राखण्यासाठी मोजणीस उपस्थित असलेल्या भूकरमापकांनी मोजणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदार व लगत खातेदार यांच्या उपस्थितीत हद्दीच्या खुणा जागेवर दाखवाव्यात, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणांमुळे हद्दी दाखवणे शक्य नसल्यास, जायमोक्यावर त्याबाबत पंचनामा करून पुढील तारीख त्याच दिवशी पंचासमक्ष निश्चित करणे बंधनकारक आहे. ही तारीख पंचनाम्यात नमूद करून सर्व संबंधितांना सूचित करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालयांकडून प्राप्त तक्रारींमध्ये मोजणी पूर्ण झाल्यानंतरही हद्दीच्या खुणा वेळेत दाखवल्या जात नसल्याचे तसेच मोजणी नकाशे उशिरा मिळत असल्याने अर्जदारांना अनावश्यक हेलपाटे मारावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. या विलंबामुळे हद्द निश्चितीबाबत संभ्रम व वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते.
मोजणी पूर्ण असूनही त्याच दिवशी हद्दीच्या खुणा निश्चित करून दाखवण्यात आल्या नसल्यास संबंधित भूकरमापकांना जबाबदार धरून नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही परिपत्रकात देण्यात आला आहे. हे निर्देश 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आले आहेत.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 03 Jun 2026 8:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit सांगली । कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवणे अत्यावश्यक असल्याने सातारा व सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण... Read more













































































