Last Updated on 12 Jan 2026 2:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
प्राचार्य डॉ. नितीन शिंदे : मसुचीवाडीत राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये मार्गदर्शन
सांगली ।
“ग्रहस्थितीचा मानवी जीवनाशी कार्यकारणसंबंध वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही. त्या कार्यकारणसंबंधावर ज्योतिषशास्त्र आधारित नाही. त्यामुळे ते फसवे असून कुंडली काढणारे व राशीचे खडे देणारे लोकांची फसवणूक करतात. तो त्यांचा मार्केटिंग फंडा आहे. तसेच लग्न ठरविताना ३६ गुण जुळविणे हा प्रकार वर्ण जाती व्यवस्थेला खतपाणी घातले जाते. त्यामुळे तरुणांनी त्याच्या होळ्या कराव्यात”, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. नितीन शिंदे यांनी केले.
मसुचीवाडी येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. राम घुले होते.
डॉ. नितीन शिंदे पुढे म्हणाले, “अनादी कालापासून आकाशातील ग्रह ताऱ्यांचे मानवास आकर्षण राहिले आहे. आकाशातील तारकापुंजाच्या समूहास मानवाने नक्षत्र कल्पिले. ग्रहगोलांचे मानवी जीवनावर परिणाम होतात असा भ्रम निर्माण करून विशिष्ट वर्गाने समाजाचे शोषण चालविले. राहू- केतू, कडक मंगळ, गुरु, शनि ग्रहांचा अरिष्ठ व भीती दाखवली. शेकडो प्रकाश वर्षे दूर असलेल्या ग्रहताऱ्यांचा धाक दाखवून आणि खगोलीय घटनांचा गैरफायदा घेऊन जन्मपत्रिका, लग्न कुंडली, शनीची साडेसाती, कालसर्पयोग व गुरुपुष्यामृत योग या नावाखाली समाजाला ठकविले व लुटले. गुणमिलनाचे गौडबंगाल सुरू केले. फलज्योतिष्य राशीचे खडे व वास्तुशास्त्र हा फसवणुकीचा फंडा आहे. जाती-वर्ण व्यवस्थेला पूरक असणारी ही थोतांडे टाकून समाजाने बंधुभाव जोपासून एक व्हावे. मानवतावादी विज्ञानवादी जीवन जगावे.”
प्रा. घुले म्हणाले, “मुलींनी मुलाची पत्रिका पाहण्यापेक्षा मुलाचे संस्कार, शिक्षण, निर्व्यसनीपणा व आरोग्य पहा. अंधश्रद्धांना बळी पडू नका.” स्वाती चौधरी यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक केले. कु. रसिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. वर्षा पाटील प्रा. पद्मा राणी पाटील प्रा. संध्या साठे प्रा. अजय आयरेकर प्रा. विजय माळी प्रा. प्रसाद जाधव व स्वयंसेविका हजर होत्या.कु. कविता परीट यांनी आभार मानले.












































































