Last Updated on 10 Jan 2026 9:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उरुण ईश्वरपूर शहरातील प्रतिष्ठित, प्रगतशील शेतकरी व उरुण–उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय स्व. संभाजीराव शिवाजी पाटील (आप्पा) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. एक मार्गदर्शक, कणखर व धाडसी नेतृत्व हरपल्याने उरुण ईश्वरपुर शहराच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
स्व. आप्पा हे उत्कृष्ट संघटक, मार्गदर्शक व धाडशी नेतृत्व म्हणून उरुण–ईश्वरपुर शहरासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात परिचित होते. महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व. मदन पाटील (भाऊ) यांचे ते निकटवर्तीय सहकारी व मित्र म्हणूनही ओळखले जात होते.
स्व. आप्पांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य मला अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. उत्कृष्ट संघटन कौशल्यासोबतच धाडस हा त्यांचा विशेष गुण होता. या गुणांमुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. शेती, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. उरुण ईश्वरपूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व केले. शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
युवकांना योग्य दिशा व विचार देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी कृतीतून पटवून दिले. स्वतःच्या मुलींना उच्च शिक्षण देऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी बनवले, तर मुलांना अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च शिक्षण दिले. एक सुसंस्कृत कुटुंब म्हणून त्यांच्या कुटुंबाची समाजात विशेष ओळख आहे.
माझ्या सामाजिक, राजकीय, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील वाटचालीत स्व. आप्पांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्पष्ट व सत्य विचारांवर ठाम राहणारे स्व. आप्पा आज आपल्यातून कायमचे निघून गेल्याने हे न भरून येणारे नुकसान माझ्यासह असंख्य सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचे झाले आहे. माझ्या आयुष्यातील चढ-उतारांचे ते साक्षीदार होते. खचून न जाता कणखर व धाडशी वृत्तीने ठाम उभे राहण्याची शिकवण त्यांनी मला व अनेकांना दिली.
आज स्व. आप्पांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबासह उरुण ईश्वरपूर शहरावर शोककळा पसरली आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
स्व. आप्पांना प्रकाश शिक्षण, आरोग्य, उद्योग समूह उरुण–ईश्वरपुर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगली जिल्हा (ग्रामीण) यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
निशिकांत भोसले–पाटील (दादा)
संस्थापक – प्रकाश शिक्षण फाउंडेशन, उरुण–ईश्वरपुर
अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगली जिल्हा (ग्रामीण)










































































