Last Updated on 24 Dec 2025 7:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन आणि कॉसमॉस सहकारी बँकेच्या वतीने पुणे येथे शानदार सोहळ्यात “ग्रीन वर्ल्ड को-प्राईड 2025” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन व कॉसमॉस सहकार बँकेच्या वतीने जागतिक सहकार वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय “सहकार मंथन”परिषदेत हे पुरस्कार वितरण करण्यात आले. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू साखर कारखाना करीत असलेल्या यशस्वी वाटचाली बद्दल हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
राज्याचे सहकारमंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सहकार मंथन परिषदेचे उदघाट्न करण्यात आले. राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर,कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष अँड प्रल्हाद कोकरे,बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे,ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौरव कोतवाल यांच्यासह साखर उद्योगातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी राज्याचे साखर आयुक्त डॉ.संजय कोलते,सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते राजारामबापू साखर कारखान्यास पुरस्कार बहाल करण्यात आला. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील,शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी पुरस्कार स्विकारला आहे. याप्रसंगी जेष्ठ संचालक प्रताप पाटील, दादासाहेब मोरे,दिलीपराव देसाई,रामराव पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,पर्यावरण अधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते.
ना. बाबासाहेब पाटील म्हणाले,राज्याचे स्वतंत्र, सर्वसमावेशक आणि व्यापक सहकार धोरण निश्चित केले जात आहे. हे धोरण निश्चित करतांना मोठ्या संस्था आणि सहकार क्षेत्रातील तज्ञाचे अनुभव व सूचनांचा विचार केला जाईल. यावेळी त्यांनी पुरस्कार प्राप्त संस्थांच्या कामाचे कौतुकही केले. राजारामबापू साखर कारखान्याचा काटकसर आणि पारदर्शी कारभार, सामाजिक बांधिकीचे धोरण, शेतकऱ्यांच्या हिताच्या कारखान्याने सुरु केलेल्या विविध योजनांचा विचार करून कारखान्याचा सन्मान करण्यात आला आहे.
प्रतिकदादा पाटील यांनी हा आमच्यासाठी आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण असून हा पुरस्कार आम्ही आमच्या कारखान्याचे संस्थापक लोकनेते राजारामबापू पाटील व ऊस उत्पादक शेतकरी बांधवाना समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.












































































