इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन
सांगली । वाळवा तालुक्याचे सुपुत्र, जगतविख्यात थोर साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर कामगार, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी समाजाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला. त्यांनी आपल्या लेखणीतून मागास व उपेक्षित समाजातील माणसांना नायक बनविले. त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान अनमोल आहे. अण्णाभाऊ साठे यांचा उरूण ईश्वरपूर येथील हा पुतळा नव्या पिढीला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा अंगीकार करीत ताठ मानेने जगण्याची प्रेरणा देईल, असा विश्वास माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
येथील कोर्टासमोरील चौकात राजारामबापू सहकारी बँकेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा श्रीमती सावित्रीमाई साठे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रा.शामराव पाटील, प्रा.डॉ.सुकुमार कांबळे, बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिक पाटील, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष उत्तम चांदणे, डॉ.विजय चांदणे, शंकरराव महापुरे, डॉ. सुधाकर वायदंडे, प्रा.डॉ.सुभाषराव वायदंडे, नंदकुमार नांगरे, विकास बल्लाळ, तानाजी साठे, माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, बाळासाहेब पाटील, विजयराव पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी टक्कर आंदोलनात रक्त सांडलेले रामभाऊ देवकुळे, बापूराव बडेकर, भास्कर चव्हाण यांचा “क्रांती योद्धा” पुरस्काराने, तर “क्रांती नायक”पुरस्काराने विकास बल्लाळ यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संतोष चव्हाण यांच्या संविधान वाचनाने करण्यात आली.
आ.पाटील म्हणाले, अण्णाभाऊ साठे हे वाळवा तालुक्याचे सुपुत्र आहेत. त्यांचे राज्यात-देशात,इतकेच काय रशियातही पुतळे आहेत. सध्या उरूण ईश्वरपूर येथे हा पुतळा उभारताना आम्हास विशेष आनंद व अभिमान आहे. आपण येत्या ८-९ महिन्यात आपणा सर्वांच्या सहमतीने पुतळ्याचे काम पूर्ण करू आणि अण्णाभाऊंच्या येत्या १ ऑगस्ट या जयंतीदिनी या पुतळ्याचे शानदार सोहळ्याने उदघाटन करू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या अधिकाराने हजारो वर्षांची वर्ण व्यवस्था उध्वस्त करून माणसाला माणसासारखे जगण्याचा अधिकार दिला आहे. अण्णाभाऊ साठे यांनी एक पुस्तक माझे वडील स्व.राजारामबापू पाटील यांना अर्पण केल्याचे माझ्या पाहण्यात आले. यावेळी त्यांनी रक्त सांडलेल्या युवकांचे विशेष कौतुक करून “असे कार्यकर्ते तुमच्या जवळ आहेत,तोपर्यंत तुमच्या श्रद्धा आणि विचारांना कोणी धक्का लावू शकत नाही, असे उद्गार काढले.
सावित्रीमाई साठे म्हणाल्या,इस्लामपूर येथे अण्णाभाऊ अण्णाभाऊंचा पुतळा उभा रहाताना पाहून समाधान वाटते. मी एकटी अण्णा भाऊंची वारस नसून संपूर्ण समाज त्यांचा वारस आहे. विजयसिंह मोहिते- पाटील,आ.जयंतराव पाटील यांनी वाटेगाव येथे शिल्पसृष्टी उभा केली. अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.
प्रा.डॉ.सुकुमार कांबळे म्हणाले,अण्णा भाऊ साठे यांनी ही पृथ्वी शेषाच्या फणावर तरली नसून ती कष्टकरी जनतेच्या तळहाता वर तरली असल्याचा विचार दिला आहे. सध्या देशात जात,धर्म,भाषा आणि राज्या- राज्यात वाद निर्माण केले जात आहे. या जातीयवादी विचारांच्या विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांना अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नवे बळ देईल. अण्णाभाऊ व लोकनेते राजारामबापू पाटील यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे नाते होते. अण्णाभाऊंनी साहित्याच्या क्षेत्रात देशाचे नांव जगात नेले असून त्यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा.
याप्रसंगी डॉ.विजय चांदणे,शंकरराव महापुरे,डॉ. सुधाकर वायदंडे,प्रा.डॉ.सुभाषराव वायदंडे,मेजर आकाश तिवडे यांनी आपल्या भाषणात पुतळा उभारणीचा संघर्ष मांडला.
यावेळी शाहीर रमेश बल्लाळ (भाटवडे) व त्यांच्या सहकाऱ्यांचा शाहीर कार्यक्रम संपन्न झाला. युवा गायक निलेश साठे (करमाळे) यांनी अण्णाभाऊंची चक्कड व भीम गीत सादर केले.
प्रारंभी प्रा.शामराव पाटील यांनी स्वागत केले,तर उत्तम चांदणे यांनी प्रास्ताविक भाषणात पुतळा उभारणीचा संघर्षाचा आढावा मांडला. रामभाऊ सातपुते (रेठरे बु:) यांनी सूत्र संचालन केले. सागर चव्हाण यांनी आभार मानले.
याप्रसंगी बी.के.पाटील,पै.भगवान पाटील, सुभाषराव सुर्यवंशी, दादासाहेब पाटील, संजय पाटील, अरुणादेवी पाटील, सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, पुष्पलता खरात, शशिकांत पाटील, डॉ.अशोक पाटील, संदीप पाटील, अरुण कांबळे, संजय बनसोडे, विजय लोंढे, संजय खवळे, विनोद बल्लाळ, शशिकांत वायदंडे,गॅब्रियल तिवडे, शैलेश सुर्यवंशी, शंकरराव चव्हाण, पिरअली पुणेकर, संग्राम जाधव, देवराज देशमुख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी,मातंग समाज व दलित चळवळीतील कार्यकर्ते,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
                                                                     
							












































































