![]()
सोमवार दि .22 सप्टेंबर 2025
घटस्थापना, शारदिय नवरात्रारंभ
या दिवशी तशी कोणत्याही सूक्ष्म मुहूर्ताची आवश्यकता नसते.
बुधवार दि . 24 सप्टेंबर 2025
सप्तरात्रोत्सवारंभ
शुक्रवार दि .26 सप्टेंबर 2025
ललिता पंचमी,
शनिवार दि . 27 सप्टेंबर 2025
पंचरात्रोत्सवारंभ
सोमवार दि .29 सप्टेंबर 2025
सरस्वती आवाहन ,महालक्ष्मी पूजन ( घागरी फुंकणे)त्रिरात्रोत्सवारंभ
मंगळवार दि .30 ऑक्टोबर 2025
दुर्गाष्टमी – महाष्टमी उपवास, एकरात्रोत्सवारंभ ,सरस्वती पूजन
बुधवार दि . 01 ऑक्टोबर 2025
नवरात्रोत्थापन व पारणा,
महानवमी -नवमी उपवास,देवीला बलिदान, आयुध पूजन-शस्त्र पूजा,सरस्वती बलिदान
गुरुवार दि . 02 ऑक्टोबर 2025
विजयादशमी (दसरा),अपराजिता व शमीपूजन , सीमोल्लंघन ,अश्वपूजा,सरस्वती विसर्जन ,
विजय मुहूर्त -दुपारी 2ः 27 ते 3:15
लेखन -प्रभाकर जंगम
पंचांगाधार दाते
![]()
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शारदीय नवरात्राचा आरंभ होतो. हा उत्सव नऊ रात्री चालतो म्हणून यास नवरात्र असे जरी आपण म्हणत असलो तरी काही वेळा तिथीच्या क्षयवृद्धीमुळे कधी नवरात्र हे आठ किंवा दहा दिवसाचेही होऊ शकते.
मातःक्षमस्व म्हणून दशमीला याची सांगता होते. हा उत्सव अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होताना दिसतो.
देवी नवरात्रामध्ये घटस्थापना, उपवास, अखंड नंदादीप, पंचमीस ललीता पूजन,षष्ठी ते नवमी पर्यंत सरस्वती आवाहन, पूजन आणि विसर्जन. प्रतिपदा ते नवमीपर्यंत माला बंधन इ.कार्यक्रम नऊ दिवस चालतात.
अश्वीन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापनेसाठी एका पत्रावळीत/पात्रात माती घेऊन शेत तयार केले जाते. ॐ वेदिकाय नमः या मंत्राने मातीची पूजा करून, ॐ सप्त धान्यभ्यो नमः या मंत्राने त्या मध्ये आपल्या घरातील धान्य घालून, ॐ वरूणाय नमः या मंत्राने पाण्याने भरलेल्या मातीच्या घटाची पूजा करून, तो घट वेदिकेवरती ठेवून, मुख्य देवतेची स्थापना केली जाते. खाऊच्या पानावर स्वस्तिक काढून पहिली माळ खाऊच्या पानाची बांधतात आणि दिव्याची पूजा करून अखंड नऊ दिवस नवरात्री दीप प्रज्वलीत ठेवतात.
नवमीला कुमारी पुजन केले जाते.
कुमारी पूजेप्रमाणे श्री दुर्गा सप्तशती किंवा सौंदर्य लहरीचा पाठ करणे हेही नवरात्राचे एक महत्त्वाचे अंग.
अष्टमीच्या दिवशी देव्हाऱ्यात कडकण्या बांधल्या जातात.
त्याचबरोबर अष्टमीस रात्री घागरी फुंकणे हा महत्त्वाचा विधी असतो.
अर्थात मातीचा घट एक पंचभौतिक मानवी देहाचे प्रतीक असून त्यात श्वास भरणे हे जिवात्म्याचे प्रतिक आहे. हा एक सामूहिक सम्मोहनाचाच प्रकार म्हणता येईल.
बऱ्याच देवी क्षेत्रात अष्टमीस रात्री चंडी होम करतात. या दिवशी देवीभक्तीचे एक प्रमुख अंग म्हणून काम क्रोधादीविकारांचे समूळ उच्चाटन करणे. या कृतीचे रूपक म्हणून चंडी होमात बलिदान म्हणून कुष्माण्ड बली (कोहळा) बली दिला जातो.
पण यासाठी पशुंची हिंसा करणे हे मात्र बलिदानाचे व विकृत रूप म्हणावे लागेल.
नवमीला शस्त्र, उपकरणे व यंत्रे यांचे पूजन केले जाते. अर्थात त्याचा वापर योग्य वेळ योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने व्हावा हा त्या पाठीमागचा उद्देश असावा.
माता क्षमस्व : असे म्हणून या व्रताची सांगता होते.देवीवरून ईशान्य दिशेकडे एक फुल वाहवे. नवरात्र समाप्तीच्या दिवशी देवीचे उत्थापन असते. विसर्जन नसते. त्यामुळे अक्षता देवीवर वाहून विसर्जन करू नये. मात्र अक्षता वाहून वरूण अर्थात घट व वेदिका यांचे विसर्जन करावे.
यानंतर देव्हा ऱ्यातील सर्व देवता यांची सोडोशोपचार पूजा करून आपल्या प्रथेनुसार दंपती किवा कुमारी यांना भोजन देण्याची प्रथा आहे. काही प्रांतात हा भोजनाचा विधी झाल्यावर मग नवरात्र उठवतात. नवरात्र काळात बऱ्याच कुटुंबात गोंधळ नामक विधी करतात. हल्ली नवरात्रात दररोज गोंधळाचा विधी करणे शक्य नसल्यामुळे फक्त अष्टमीच्या दिवशी एक दिवस गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
विजय दशमी – दसरा हा नवरात्र समाप्तीनंतर येणारा कुलधर्म होय. काही ठिकाणी नवरात्रोत्थापन विजयादशमीस करण्याची प्रथा आहे देवी क्षेत्रात विजयादशमीस देवीची उत्सव पूर्वक मूर्ती पालखीतून मिरवत नेली जाते.
विजयादशमीस देवीस पंचामृचा महाभिषेक केला जातो. सायंकाळी सीमोल्लंघन केले जाते. हल्ली शहराच्या विस्तृती करणामुळे सीमोल्लंघनाचा विधी हा त्या त्या गावातील शिष्ट संकेतानुसरून सर्वसामान्य अशा एखाद्या ठिकाणी उदा .सार्वजनिक चौफुला, मंदिर आपट्यांचा वृक्ष इत्यादी ठिकाणी जाऊन पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. विजयदशमीस शमी व आपटा या वनस्पतीच्या पानांची आपापसात देवान घेवान करतात. याला सोने लुटणे असे म्हणतात.
शमी शमयते पापं शमी शत्रुविना शिनी।
अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रिय वादिनी।
किंवा
शमी शमयते पापं शमी लोहितकण्टका ।धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रिय वादिनी।
असे म्हणत काही लोक ही पाने एकमेकांना देतात.
सीमोल्लंघना दिवशी स्त्रिया औक्षण करतात.
या देवी सर्वभूतेषु बुद्धीरूपेन संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।
या व्रत्तातील विज्ञान पाहिलेस घटस्थापना म्हणजे वरूण वेदिका स्थापना होय. अर्थात वेदिका म्हणजे शेती व वरूण म्हणजे पाणी . माती आणि पाण्याचा जणू गौरवच!
मानवाच्या संपूर्ण भरण पोषणाचा भार शेती उचलते, शेतीत सुपाने घातले तर खंडीने उगवते तसेच पाणी म्हणजे माणसाचे जीवन ! मानवाने निसर्गातील कृषी मातेचे व जलदेवतेचे ऋण व्यक्त करण्यासाठी घटस्थापनेची निर्मिती केली असावी असे मला वाटते.
या वेळी नुकतीच पावसाळी पिके निघून हिवाळी पिकांच्या पेरणीचा मोसम सुरू होणार असतो. या नऊ दिवसात वेदिकेत पेरलेले,आपल्या घरातील बीज शेतीत पेरण्यास योग्य आहे की नाही, या अत्यंत कमी खर्चातील प्रयोगासाठी घटस्थापनेच्या पूजेची स्थापना झाली असावी असे मला वाटते.
तसेच दशमीला उगवलेला अंकुर देवाला वाहण्याची प्रथा आहे. अर्थात जे देवासाठी ते देहासाठी. आयुर्वेदानुसार गव्हांकुराचे महत्त्व वेगळे सांगायला नको. देवी नवरात्रामध्ये अखंड नंदा दीप म्हणजे
तमसो मा ज्योतिर्गमय ।अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव.
नवरात्रीला कुमारी पूजेच्या निमित्ताने स्त्रीला मानाचे स्थान व तिचा सन्मान तिच्या लहानपणीच या व्रत्ताने केलेला दिसतो.
चिंतन, ध्यान,उपोषण परांन्न सेवन, ऐहिक सुखाचा त्याग, ब्रह्मचर्य यामुळे रहाटगाड्यातून मुक्तीकडे जाण्याचा संदेश आपोआप आपणास मिळतो.
यामध्ये षष्ठी ते नवमीच्या काळात सरस्वती आवाहन, पूजन आणि विसर्जन हा विधी केला जातो.
माझ्या मते – सरस्वती आवाहन म्हणजे नवीन पुस्तकाची खरेदी. पूजन म्हणजे त्याचे चिंतन आणि विसर्जन म्हणजे परत नवीन वाचन यावरून प्रत्येकाच्या घरी ग्रंथालय अपेक्षित आहे.आज इतरांच्यात राहू दे, निदान ज्ञानदान करणारे उदा. शिक्षक ,अध्यापक यांचे घरी तरी ग्रंथालय हवे कारण ग्रंथ त्यांचे शस्त्र होत.यावर हे व्रत वाचन संस्कृती जपण्यास मदत करते असे मला वाटते.
मला बंधनाने दिग्बंधित होऊन नवरात्रीच्या ज्योतीने आपलं जीवन प्रकाशमय होऊन, या आत्म ज्योतिचा प्रकाश आपल्या संपूर्ण अंतरंगात पसरून, आपलं जीवन चैतन्यमय आणि सुखमय व्हावे.
शंका समाधान -समज गैरसमज
1) प्रश्न : देव बसलेले असल्यामुळे देवी बरोबर इ देवानाही आम्ही न हलवता पूजा करतो हे कितपत योग्य आहे?
उत्तर – नवरात्र बसविल्यानंतर ज्या देवतेचे नवरात्र असेल त्या देवतेची पूजा करताना फुलांनी पाणी शिंपडून स्नान, इ. उपचार करावेत आणि इतर देवतांना नेहमीप्रमाणे ताम्हनात घेऊन अभिषेक स्नान, इ. उपचार करून स्वतंत्रपणे पूजा करावी. काही ठिकाणी नवरात्र बसविल्यावर इतर देवांची पूजा करीत नाहीत हे योग्य नाही.
2) प्रश्न : प्रकृति अस्वास्थ्य किंवा वयोमान, इ. मुळे नवरात्राचे उपवास रोज करणे शक्य नसेल तर काय करावे?
उत्तर :बसता-उठता दोन दिवस उपवास करावा किंवा फक्त अष्टमीचा उपवास करावा किंवा 9 दिवस धान्यफराळ म्हणजे भाजके खावे.
4) प्रश्न : अशौचामुळे नवरात्रातील काही दिवस पूजेसाठी मिळत असतील तरअशा वेळेस काय करावे?
उत्तर :अशा वेळेस ७ दिवस, ५ दिवस, ३ दिवस, १ दिवसाचे नवरात्र करता येते, पंचांगात अशा दिवसांचा उल्लेख सप्तरात्रोत्सवारंभपंचरात्रोत्सवारंभ, त्रिरात्रोत्सवारंभ अशा प्रकारे केलेला असतो. अशा दिवशी घटस्थापना करून नवमी पर्यंत नवरात्राची पूजा करता
5) प्रश्न : काही वेळा नवरात्र दहा दिवसाचे ही होऊ शकते त्यावेळी माळा किती अर्पण कराव्या?
उत्तर : नवरात्र मध्ये देवीस रोज एक माळ या प्रमाणे जितक्या दिवसाचे नवरात्र असेल तेवढ्या माळा अर्पण कराव्यात तिथिचा क्षय आहे म्हणून एकाच दिवशी दोन माळा अर्पण करू नये.
6) प्रश्न : नवरात्र सुरू झाल्या नंतर अशौच आले तर काय करावे?
उत्तर : पूजा दुसऱ्याकडून करून घ्यावी रोज पूजा करण्यास कोणी मिळाले नाही तर शेवटच्या दिवशी पूजा करून नवरात्र उठून घ्यावे.
5) प्रश्न : एखाद्या घरात व्यक्तीचे निधन घडते त्यावर्षी नवरात्र न बसवण्याचा प्रघात आहे हे कितपत शास्त्रीय आहे?
उत्तर : हे अशास्त्रीय आहे.
6) प्रश्न : देवीची नऊ रूपे कोणती ?
उत्तर : 1. शैलपुत्री, 2. ब्रह्मचारिणी 3. चन्द्रघंटा 4. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) 5. स्कंदमाता 6. कात्यायनी 7. कालरात्री 8. महागौरी 9. सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
7) प्रश्न : दोन ते दहा वर्षाच्या मुलीस कुमारी अशी संज्ञा आहे पण वयानुसार त्यांची कोण कोणती नावे आहेत?
उत्तर : दोन वर्षाची ‘कुमारी’, तीन वर्षाची ‘त्रिमूर्ती’, चार वर्षाची ‘कल्याणी’, पाच वर्षाची ‘रोहिणी’, सहा वर्षांची ‘कालिका’, सात वर्षांची ‘चंडिका’, आठ वर्षांची ‘शांभवी’, नऊ वर्षांची ‘दुर्गा’, व दहा वर्षांची ‘सुभद्रा’ अशी वयानुसार तिला विविध नावे आहेत. वयानुसार वरील नावे घेऊन कुमारी पूजा केली जाते.
8) प्रश्न : कुमारी पूजन थोडक्यात कसे करावे?
उत्तर : मंत्राक्षरमयीं लक्ष्मीं मातृणां रूप धारणीम् ।नवदुर्गात्मिका साक्षात् कन्यां आवाहयाहम्॥
या मंत्राने कुमारिकेच्या मस्तकावर अक्षता वाहून आव्हान करावे. नंतर तिच्या वयाच्या अनुसरून वरीलपैकी योग्य नाव निवडून त्यांच्या पूजा मंत्रांनी त्या नावाच्या चतुर्थी विभक्यन्त यांचे नावाने तिची सोडशोपचार पूजा करावी.
त्याचे नाममंत्र पुढील प्रमाणे – कुमार्ये नमः त्रिमूर्त्यै नमः कल्याण्यै नमः रोहिण्यै नमः कालिकायै नमः चंडिकायै नमः शाम्भव्यै नमः दुर्गायै नमः सुभद्रायै नमः
9) प्रश्न : नवरात्राच्या उपवासाचे महत्त्व काय?
उत्तर : उपवास ह्याचा अर्थः ‘उप’ म्हणजे जवळ, ‘वास’ म्हणजे रहाणे. परमेश्वराच्या जवळ रहाणे, त्यांचं सतत मनन आणि चिंतन करणे. त्यासाठी सात्त्विक शुद्ध अन्न घेणे गरजेचे आहे म्हणून नवरात्रात नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. घरातील मुख्य व्यक्ती ते उपवास करते. त्या व्यक्तीच्या हयातीनंतर घराची सूत्रे ज्या व्यक्तीकडे येतात, ती उपवास करते म्हणजेच त्या कुटूंबात ती प्रथा आपोआपच चालू राहते.
शक्ती देवतेची उपासना करताना मन व शरीर शुद्ध रहावे, परमेश्वराचे सानिध्य लाभावे, त्याची सतत आठवण रहावी हा उद्देश आहे.
शुभंभवतु।
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तु सल्लागार आहेत)
![]()
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993










































































