Last Updated on 11 Sep 2025 8:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । केंद्र शासनाच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम म्हणजेच विंडस् प्रकल्पांतर्गत सांगली जिल्ह्यातील सर्व ६९६ ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामुळे २४ तास हवामान निरीक्षण केले जाणार असून, इंटरनेट, मोबाईल ॲपद्वारे हवामान घटकांबाबतची माहिती उपलब्ध होणार असल्याने ही स्वयंचलित हवामान केंद्रे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
विंडस् प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायत स्तरावर प्रथम प्राधान्याने शासकीय जागेत स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मिरज तालुक्यात ६४, तासगाव तालुक्यात ६८, क. महांकाळ तालुक्यात ५९, जत तालुक्यात ११६, खानापूर तालुक्यात ६४, आटपाडी तालुक्यात ५३, कडेगाव तालुक्यात ५४, पलूस तालुक्यात ३३, वाळवा तालुक्यात ९४ आणि शिराळा तालुक्यात ९१ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे नेहमीच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. झालेल्या नुकसानीच्या नोंदी तात्काळ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्र्यांना वेळेत मदत मिळत नाही. या सर्व प्रकारावर स्वयंचलित हवामान केंद्रामुळे मात करता येणार आहे. प्रशासनास अतिवृष्टीची अचूक व वेळेत माहिती मिळणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्रामुळे दैनंदिन पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग इ. माहिती वेळेत मिळण्यास मदत होऊन, गावागावातील नुकसानीचा खरा अहवाल शासकीय यंत्रणेपुढे जलदतेने येण्यास मदत होणार आहे. लवकरच शासनाकडून ही केंद्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे ते म्हणाले.
यापूर्वी केवळ महसूल मंडळ स्तरावर ही आकडेवारी उपलब्ध होत होती. स्वयंचलित हवामान केंद्रे उभारल्यानंतर ती प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणार आहे. या केंद्रांमुळे २४ तास हवामानाचे निरीक्षण होऊन इंटरनेट, मोबाईल ॲपद्वारे ही रिअल टाईम माहिती उपलब्ध होणार आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेप राहणार नाही. प्रशासनास अतिवृष्टीची अचूक माहिती मिळणार आहे. अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती यापुढे ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणार असल्याने क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होऊन बाधितांना तातडीने नुकसानभरपाई मिळण्यास मदत होणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात आल्यास चक्रीवादळ, दुष्काळ, आग, पूर, गारपीट, ढगफुटी, थंडीची लाट इत्यादि नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामानविषयक माहिती ग्रामपंचायत स्तरावरच उपलब्ध होईल. या केंद्रांमुळे पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग या हवामानविषयक घटकांची माहिती प्राप्त होते. या घटकांसंदर्भात स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे प्राप्त माहितीचा वापर एआय (AI) प्रणाली तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हवामानविषयक माहितीचे संकलन, विश्लेषण, शेतकऱ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन इत्यादि बाबींसाठी उपयुक्त ठरेल.









































































