Last Updated on 22 Aug 2025 7:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर परिसरातील नागरिकांसाठी आर्थिक सेवांचा नवा अध्याय सुरू करत समर्थ को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ सोहळा शनिवारी साई संस्कार बिल्डिंग, सप्तर्षी चौक, डांगे चौक रोड येथे उत्साहात पार पडला.
प्रमुख पाहुणे यशवंत ग्लुकोज कारखान्याचे संचालक व वाळवा तालुका इंजिनियर्स असोशिएशनचे माजी विजय ऊर्फ उदय मुळीक यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
या सोहळ्याच्या निमित्ताने श्री सत्यानारायण महापूजा संपन्न झाली. तसेच महिलांसाठी हळदकुंकू समारंभ घेण्यात आला. मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या.
उद्घाटन सोहळ्यात सोसायटीतर्फे सभासदांसाठी विशेष १० टक्के शुभारंभ मुदत ठेव योजना (कालावधी १५ महिने) जाहीर करण्यात आली. या योजनेला सभासद व ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.
या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे विजय मुळीक यांनी सांगितले की, “ही संस्था अल्पावधीत लोकांचा विश्वास जिंकणारी संस्था ठरली आहे. ग्रामीण भागात बचत आणि पतपुरवठा या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन घडविण्याचे काम ही संस्था करेल, असा विश्वास आहे.”
संस्थापक चेअरमन संदीप पाटील यांनी सांगितले की, “आमचे ध्येय केवळ बँकिंग व्यवहारापुरते मर्यादित नाही, तर सभासदांच्या प्रगतीसाठी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविणे हे देखील सोसायटीचे उद्दिष्ट आहे.”
सोहळ्याला सोसायटीचे सर्व संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































