एका उच्चपदस्थ व्यक्तीने जीवनात मोठं यश मिळवलं. गाडी, बंगला, प्रतिष्ठा… सगळं मिळालं. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर त्याने अनेक जुन्या ओळखी तोडल्या. “आता मला कोणाची गरज नाही, लोकांना माझी गरज आहे,” असा दर्प त्याच्या वागण्यात उतरला.
यश, पैसा, ओळख… सगळं मिळालं होतं त्याला. आणि त्याचसोबत आली होती एक सवय… जुने लोक कट करत जाण्याची.
“हा आता कोण कामाचा नाही… हा फार बोलतो… हे नाते उरलंय तरी कशाला?”
ब्लॉक लिस्ट मोठी होत गेली. आणि आपल्याला सगळं माहीत आहे, असं वाटू लागलं.
पण एक दिवस… आई हॉस्पिटलमध्ये होती. रक्तदाब कोसळलेला. B – नेगेटिव्ह रक्त कुठेच मिळत नव्हतं. सगळे फोन संपले, कॉल लावून थकला.
तेव्हा नर्सने सांगितलं, “एकजण आलाय… तो म्हणतो, तुमचा जुना ओळखीचा आहे.”
तो बाहेर आला… आणि हादरलाच!
तो होता तोच मित्र – काही वर्षांपूर्वी त्याने त्याच्यावर संशय घेतला, वाद झाला, आणि नातं संपवलं. त्याला ब्लॉक केलं होतं.
पण तो आला होता – रक्त द्यायला. आईसाठी.
त्याने फक्त एवढंच म्हटलं,
“आई कुणाचीही असो… ती वाचली पाहिजे.”
त्या क्षणी त्याचा अहंकार कुठे गेला, कळलंच नाही. डोळ्यात पाणी आलं… आणि त्यानं त्याचं नाव पुन्हा Unblock केलं – मनातून! आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवून गेला… ज्यांना आपण गरज नसलेलं समजतो, तेच आज मदतीला धावले.
ही गोष्ट एकाच माणसाची नाही… ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे.
आज आपण यशाच्या शिखरावर पोहोचतो, पण माणसं हरवतो. आपण हिशोब ठेवतो – “हा फक्त एवढ्या वेळसाठी कामाचा.”
पण… आयुष्य मात्र हिशोब ठेवत नाही. आजही हजारो लोक नात्यांचं वजन ‘गरज’ या काट्यावर मोजतात. आपल्याला गरज नाही म्हणून दुसऱ्याची किंमत उरत नाही.
पण… आयुष्यात गरज कोणाची लागेल हे नशिबालाही ठाऊक नसतं.
“ब्लॉक केलं असलं, तरी नातं संपत नाही… आणि संकटात ‘Unblock’ होणारी माणसंच खरी आपली असतात.”
सदगुरू श्री वामनराव पै यांचं वाक्य आजही आठवतं…
“कोण, कुठे, कोणाला, केव्हा, कसा उपयोगी पडेल – हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही!”