सांगली । मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गोर-गरीब ५१ कुटुंबांना घराच्या मिळकत पत्रिकेचे (प्रॉपर्टी कार्ड) वाटप करताना खूप समाधान वाटते. आहे त्या, परिस्थितीत अडकू नका. आपल्या मुलांना शिकवा,मोठे करा आणि आज जिथे घरकुल आहे,तिथे बंगला उभा करण्याचे स्वप्न पहा, अशी भावना आ.जयंतराव पाटील यांनी कासेगाव (ता.वाळवा) येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. याकामी देवराज पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे,याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
कासेगाव येथील यशवंत कॉलनी या बेघर वसाहती तील रहिवाशांना तब्बल ५० वर्षानंतर घराच्या मिळकत पत्रिकेचे (प्रॉपर्टी कार्ड) आ.पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी जि.प.अध्यक्ष देवराजदादा पाटील, माजी सरपंच उदयबापू पाटील,सरपंच कल्पना गावडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील,माजी सभापती स्व.जनार्दनकाका पाटील,माजी सरपंच स्व.यशवंतअण्णा पाटील यांच्या प्रतिमेंचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
आ.पाटील म्हणाले,स्व.यशवंत पाटील यांनी १९७५ साली ज्यांना घर नाही, जमीन नाही अशा कुटुंबांच्यासाठी वसाहत वसविली होती. त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अडीच एकर जमीन घेऊन त्यामध्ये उभे-आडवे रस्ते,गटारी बांधल्या. मात्र या कुटुंबांना मिळकत पत्रिका मिळण्यात काही अडचणी आल्या. देवराज पाटील यांनी याकामी सातत्याने पाठपुरावा केला,आणि आजचा दिवस उजाडला आहे.
देवराज पाटील म्हणाले,माझे घर माझ्या नावावर असावे,हे प्रत्येकाचे स्वप्न असते.आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करून ते पूर्ण करू शकलो,याचा आम्हा सर्वांना आनंद आहे.
याप्रसंगी उपसरपंच सुजित पाटील, माजी सरपंच किरण पाटील, माजी प.स.सदस्य सुभाषराव आडके, माजी उपसरपंच दाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश माने, संगीता जाधव, कल्पना देशमुख, संतोष पाटील, दादासो पाटील यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
निवास जाधव,प्रकाशबापू जाधव, निवास पाटील,निखिल सावंत, गफूर देसाई,पंडीत माळी (गोसावी), अशोक कांबळे, राजाराम यादव, मोहन आडके, विलास जाधव, सचिन जाधव, सोमा साळुंखे यांच्यासह रहिवाशांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
प्रारंभी राजू रणदिवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी ग्रा.पं.सदस्य दिनकर जाधव यांनी आभार मानले.