Last Updated on 01 Jun 2025 10:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सिंधुदुर्ग । राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या मद्याचे बॉक्ससह एक कार जप्त केली आहे. ही कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयाकडून करण्यात आली असून, एकूण ५ लाख १० हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
ही कारवाई ०१ जून २०२५ रोजी पहाटे ३ वाजता वेंगुर्ला बेळगाव रस्त्यावर (आकेरी दांड्याचे गाळू, गोवा-मुंबई महामार्ग क्र. ६६) पुलाखाली करण्यात आली. खात्रीशीर माहितीनुसार तपासणीदरम्यान मारुती सुझुकी स्विफ्ट (एम एच ०२ डिएस ५६०७) या गाडीमध्ये गोव्यात विक्रीसाठी असलेली, पण महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली मद्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
कारचालक सुजल सचिन पवार (वय २१, रा. तेरसे बांबर्डे गोसावीवाडी, ता. कुडाळ) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम.एच. गरुड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात दुय्यम निरीक्षक यु.एस. थोरात, ए.ए. वंजारी, सहाय्यक दु.नि. एस.एस. चौधरी, जवान एन.पी. राणे, पी.ए. खटाटे, एस.एम. कदम व एस.आर. महेकर यांचा समावेश होता.
या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक यु.एस. थोरात हे करत आहेत.













































































