लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी 25 कोटींची तरतूद
सांगली । लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सांगली जिल्ह्यात वाटेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्या जन्मभूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी शासनाने 25 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा पंधरा दिवसात ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सचिन पाटील, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मेघराज भाते, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुजित भांबोरे, सम्राट महाडिक, वाटेगावच्या सरपंच नंदाताई चौगुले, उपसरपंच सोनाली पाटील, ग्रामपंचायत अधिकारी शुभांगी भारती, सचिन साठे, मोहन साठे आदी उपस्थित होते.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, सद्यःस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या मालकीतील 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अधिकाऱ्यासमवेत आवश्यक नियोजनावर चर्चा करण्यात आली आहे. स्मारक उभारणीमुळे अण्णा भाऊ साठे यांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे मंत्री शिरसाट यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नियोजित सुंदर स्मारक उभारण्यासाठी प्रस्तावित असलेल्या वाटेगाव येथील तलावाच्या ठिकाणाच्या गटांची मोजणी लवकर करण्यासाठी जिल्हा प्रशासनास निर्देश दिले असून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय केला जाणार नाही. स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. स्मारक उभारणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्रारंभी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वाटेगाव येथील तलावाशेजारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी प्रस्तावित असलेल्या जागेची पाहणी करून त्याबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे व संबंधित यंत्रणेंकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व तेथील शिल्पसृष्टीची पाहणी केली.
प्रास्ताविकात सचिन साठे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल यांच्या सविस्तर माहिती दिली. स्मारकासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यांच्या उंचीला शोभेल असे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्रोत : जि. मा. का., सांगली