सांगली । पहिल्या आठ वर्षात मुलांवर कसलीही सक्ती करायची नसते. मेंदू प्रचंड सजग आहे, जे द्याल ते स्वीकारते. पण काही लादले गेले तर ते त्यासाठी तयार नसते. या वयातील अभ्यासाची जबरदस्ती मुलांना अभ्यासापासून लांब नेते.त्यामुळे खेळातून व अनुभवातून शिक्षण देणारी मुक्तांगण प्ले स्कूलची संकल्पना पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार मेंदू तज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या,” मुलांमधील गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता शोधण्यापूर्वी पालकांनी आधी स्वतःचा शोध घ्यावा.”
इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूल अँड अँक्टिव्हिटी सेंटरच्या वतीने ‘चला मेंदूत डोकवूया’ या विषयावर आयोजित पालकसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुक्तांगणच्या संचालिका वर्षाराणी मोहिते,निवृत्त मुख्याध्यापिका सरोजनी मोहिते उपस्थित होत्या.
त्या म्हणाल्या, “आईच्या पोटात असताना आईच्या आवाजाचाही परिणाम बाळाच्या मनस्थितीवर होत असतो. टिन एज पर्यंत बाळासाठी आई महत्वाची असते. जन्मल्यापासून ब्रेन डेव्हलपमेंट सुरू होते ती शेवटच्या श्वासापर्यंत सुरू असते.
मुले सतत बदलत असतात. इमोशनल इंटिलिजन्स म्हणजे आपणाला मुलांच्या भावना नियंत्रित ठेवता येणे आणि त्या समजून घेणे आहे. त्यामुळे मेंदूतील ताण निर्माण करणाऱ्या रासायनिक प्रक्रिया नियंत्रित राहतात. आपण चिडतो तेव्हा सर्वात जास्त त्रास स्वतःला होत असतो. हॅप्पी केमिकल्स ही संकल्पना समजून घ्या. रागावर नियंत्रण ही आपल्या हातातील गोष्ट आहे. व्हाट्सअप्प फॉरवर्ड बंद करा. त्यातून आपण समाजात भीती, अस्थिरता वाढवत आहोत. मुले हे सगळं पाहत असतात, पुढे जाऊन तेही हेच करणार आहेत.”
निवृत्त मुख्याध्यापिका सरोजिनी मोहिते व सचिव विनोद मोहिते यांनी डॉ. पानसे यांचा सत्कार केला. मुक्तांगण च्या संचालिका वर्षाराणी मोहिते आणि सहकाऱ्यांनी संयोजन केले. पालक उपस्थित होते.
हातांच्या ठशांवरून मुलाचे करियर तपासणे अशास्त्रीय..!
नियमित संवाद महत्त्वाचा..
मुलांच्या कोणत्याही बौद्धिक चाचण्या किंवा तपासण्या करण्यापेक्षा मुलांशी लहानपणापासून संवाद व्यवस्थित ठेवलात तर आपणाला मुलांच्या कोणत्याही तपासण्याची गरज नसते. हातांच्या ठशांवरून मुलाचे करियर तपासणे यावर सायकॉलॉजीकल असोसिएशनने बंदी घातली आहे, असेही डॉ. पानसे यांनी यावेळी सांगितले.यावेळी पालकांनी विविध प्रश्न विचारले त्याला डॉ. पानसे यांनी उत्तरे दिली.
आपण कुणीतरी भव्यदिव्य , मुलांना भासवू नका..!
मुलांच्या मनात अभ्यास, परीक्षा, गुण देण्याची पद्धत यामुळे मोठ्या प्रमाणात न्यूनगंड निर्माण होत असतो. यावरून आपली शिक्षणव्यवस्था कुणासाठी हा गंभीर प्रश्न आहे.आपण व्यवस्था बदलू शकत नाही, परंतु आपल्या मुलांना आपण कसे विकसित करायचे हे ठरवू शकतो,
मुलांबद्दल पालकांची अति संवेदनशीलता धोक्याची आहे. यात मुलांचे खूप नुकसान होते. मुलांना त्यांचे बालपण मनसोक्त जगू दिले पाहिजे. आपण कुणीतरी भव्यदिव्य आहोत, असे मुलांना भासवू नका. नेहमी सामान्य वातावरण ठेवा.
डॉ. श्रुती पानसे
मेंदू तज्ञ पुणे