Last Updated on 17 Apr 2025 6:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । लांब पल्ल्याच्या एसटी बससेवेसाठी प्रवासादरम्यान प्रवाशांना थांबणाऱ्या हॉटेल-मोटेल थांब्यांवर आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यास, अशा थांब्यांवर बस थांबवण्यास बंदी घालण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
या संदर्भात सुरू असलेल्या सर्व थांब्यांंचा तातडीने आढावा घेऊन, प्रवाशांना दर्जेदार सुविधा नसलेल्या हॉटेल्सशी असलेले करार तात्काळ रद्द करण्याचे आदेश एसटी प्रशासनाला देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना देखील याबाबत तातडीने सूचना दिल्या आहेत.
बससेवेदरम्यान विविध हॉटेल्समध्ये थांबून प्रवाशांना चहा-नाश्ता किंवा जेवणासाठी विश्रांती दिली जाते. मात्र काही हॉटेल्समध्ये अस्वच्छता, अयोग्य सुविधा, अन्नाचा निकृष्ट दर्जा, शौचालयांची दयनीय अवस्था आणि कर्मचारी व मालकांचा वाईट वर्तनाचा अनुभव अनेक प्रवाशांना येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे एसटी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावामुळे प्रवाशांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये, असा ठाम संदेश श्री. सरनाईक यांनी दिला आहे. यासाठी राज्यभरातील सर्व विभागांनी असे थांबे तातडीने तपासून आवश्यक त्या सुधारणा १५ दिवसांच्या आत कराव्यात आणि अहवाल सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.












































































