Last Updated on 17 Apr 2025 9:43 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । गावाकडच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या ट्रॅक्टर, टिप्पर आणि मोठ्या वाहनांतून सुरू असलेल्या माती व मुरूम वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. परवाना नसलेले चालक, वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसणे, रात्री अपरात्री सुरू असलेली वाहतूक आणि कर्णकर्कश टेपरेकॉर्डरचा आवाज हे सगळं प्रकारे नियमांचं उघडपणे उल्लंघन होत असल्याचं चित्र सध्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
वास्तविक पाहता, गौण खनिज वाहतूक ही नियमानुसार आणि परवाने घेऊनच करावी लागते. मात्र प्रत्यक्षात ही वाहतूक बेजबाबदारपणे केली जाते. अनेक वाहनचालकांकडे ना वैध परवाना असतो, ना वाहनांची कागदपत्रं पूर्ण असतात. त्यातच ही वाहने गावातल्या मुख्य रस्त्यांवरून भरधाव वेगाने धावत असतात.
या वाहनांतून लावण्यात येणारा कर्णकर्कश आवाजही त्रासदायक ठरत आहे. मोठ्या स्पीकर्सवर लावलेली गाणी, वाजवलेली सायरनसदृश हॉर्न, यामुळे रुग्ण, विद्यार्थी, वृद्ध आणि नागरिक हैराण झाले आहेत.
या साऱ्या प्रकारांना कोणतंही प्रशासनिक रोख नाही. महसूल विभाग, पोलिस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग आणि खनिज विभाग अशा चार यंत्रणा असतानाही या वाहतूक नियंत्रित होताना दिसत नाही. वाहनं थांबवून कागदपत्रं तपासली जात नाहीत, अपघात झाल्यानंतरच हालचाल होते, अशी जनतेत नाराजी आहे.
शासनाकडून वेळोवेळी नियमावली जाहीर केली जाते. माती, मुरूम, वाळूसारख्या गौण खनिजांच्या उत्खनन व वाहतुकीसाठी विशेष परवाने आवश्यक असतात. या वाहतुकीत GPS ट्रॅकिंग, वेळेचे बंधन, वजन मर्यादा आदी नियम आहेत. पण प्रत्यक्षात यावर कुठेही अंमलबजावणी दिसत नाही.
स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायती याकडे वारंवार लक्ष वेधत आहेत. आता तरी प्रशासनाने या बेशिस्त खनिज वाहतुकीला आवर घालावा आणि कारवाईची गंभीरता दाखवावी, अशी मागणी होऊ लागली आहे. अन्यथा एखादा मोठा अपघात होईपर्यंत या प्रश्नाचं गांभीर्य समजणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 04 May 2026 3:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit सिसिलिया कार्व्हालो, विवेकानंद गोपाल, सुरेंद्र दरेकर, रणधीर शिंदे, अनंत कदम यांचा समावेश ईश्वरपूर । राज्याचे माजी मंत्र... Read more










































































