Last Updated on 02 Apr 2025 5:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याचं सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
सांगली । महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2025 कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या निवडणूक कार्यक्रमांतर्गत दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सर्व मतदारांनी सर्व नियमांचं पालन करून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे.
मतदानासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, परिचर्या शिक्षण महाविद्यालय सांगली दक्षिणाभिमुखी इमारतीमध्ये एकूण 4 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर एकूण 2 हजार 491 इतक्या मतदारांसाठी मतदान व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी दिली. या निवडणूक प्रक्रीयेअंतर्गत, नोंदणीकृत MBBS डॉक्टर हे मतदार आहेत.
निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून एकूण ४१ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. या उमेदवारांपैकी ९ उमेदवार निवडून देण्याचं असल्यानं प्रत्येक मतदार ९ मते देवून आपला मतदानाचा हक्क बजावेल. या मतदानासाठी मतदारांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य ओळखपत्र किंवा लोकसभा विधानसभा नुसार अनिवार्य असणारे ओळखपत्र मतदानासाठी घेवून येण्याचं आहे. या निवडणुकीसाठी परिवेक्षीय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे तसंच डॉ. तुषार बनसोडे यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
निवडणूकीसाठी सातारा प्रशासन सज्ज
सातारा । महाराष्ट्र वैदयकीय परिषद निवडणूक 2025 जाहीर झालेली असून ही निवडणूक ही प्रत्येक जिल्हयाच्या मुख्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी गुप्त मतदान पध्दतीने सकाळी 8 ते सायंकाळी 5 घेण्यात येणार आहे. निवडणूक घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
सातारा जिल्हयातील मतदान केंद्राचे ठिकाण जिल्हा रुग्णालय सातारा फिल्ड हॉस्पिटल खोली क्रमांक 1 व खोली क्रमांक 2 मध्ये पार पडणार आहे. एकूण 2 मतदान केंद्र आहेत. सातारा जिल्हयात एकूण 1 हजार 884 मतदार असून मतदान केंद्र क्र 1 येथे अनु क्र 1 ते 951 एकूण 951 मतदार व मतदान केंद्र क्र 2 येथे अनु क्र. 952 ते 1 हजार 884 एकूण 933 मतदार जोडण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र वैदयकीय परिषद निवडणूक 2025 करिता दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्र वैदयकीय परिषदेकडे नोंदणी झालेले व सदर नोंदणी नुतणीकरण केलेले वैदयकीय व्यावसायीक हे मतदार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदार यादी प्रसिध्द केली आहे.
प्रत्येक मतदाराला 9 मते देण्याचा अधिकार आहे. एकूण 41 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. मतदारांना ओळख पटविण्यासाठीचे दस्तऐवज मतदार यादीत ज्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला असे सर्व वैदयक व्यावसायी व्यक्तीशः मतदान करतील आणि मतदारांची ओळख पटविणे सुकर होण्यासाठी पुढील ओळखपत्रे ग्राहय धरण्यात येतील यामध्ये महाराष्ट्र वैदयकीय परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाचे विधानसभा, लोकसभा निवडणूकीच्या मतदारांसाठी जो ओळखपत्र ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे अशी छायाचित्रासहित ओळखपत्रे. तसेच नोंदणी प्रमाणपत्रावर छायाचित्र नसल्यास संबधीत मतदाराची ओळख पटविण्यासाठी ज्यावर छायाचित्र आहे असे ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे.
मतदान केंद्रावरील निवडणूक कामकाज होण्यासाठी केंद्राध्यक्ष म्हणून नायब तहसिलदार दर्जाचे अधिकारी व इतर महसूल कर्मचारी असे एकूण 15 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेली आहे. क्षेत्रीय अधिकारी म्हणून डॉ. महेश खलिपे जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा, समन्वय अधिकारी डॉ. भारती दासवाणी प्राध्यापक औषधशास्र विभाग शासकिय वैदयकीय महाविदयालय, सातारा व सातारा जिल्हयाचे निवडणूकीचे संपूर्ण कामकाज भगवान कांबळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती शिल्पा किरण परब निबंधक महाराष्ट्र राज्य दंत परिषद मुंबई हे पाहात आहेत.












































































