बहे, ता. वाळवा (सांगली) | पावन कृष्णेच्या तीरावर वसलेल्या रामलिंग बेटावर सध्या भाविक आणि पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः शनिवार-रविवारी येथे मोठ्या प्रमाणावर कौटुंबिक भाविक आणि पर्यटकांची उपस्थिती दिसून येत आहे. श्रीराम आणि हनुमानाच्या दर्शनासाठी पश्चिम महाराष्ट्रातून हजारो श्रद्धाळू येत आहेत, त्यामुळे रामलिंग बेट परिसर गजबजून जात आहे.
बहे गावाच्या पश्चिमेस वसलेले रामलिंग बेट हे केवळ धार्मिक स्थळ नसून, ऐतिहासिक वारसाही जपणारा ठेवा आहे. रामायण काळापासून या ठिकाणाचा उल्लेख असून, याला दंडकारण्याचा भाग मानले जाते. सुमारे 1 कि.मी. लांब आणि अर्धा कि.मी. रुंद खडकाच्या बेटावर वसलेले हे तीर्थक्षेत्र भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. इस्लामपूरपासून अवघ्या 10 कि.मी. आणि कृष्णा साखर कारखान्यापासून 7 कि.मी. अंतरावर हे ठिकाण असल्याने ते सहज गाठता येते. 1884 च्या बॉम्बे गॅझेटमध्येही बहे गावाचा उल्लेख असल्याचे आढळते.
गेल्या काही वर्षांत भाविक-पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी श्रावण महिन्याच्या आगमनानंतर या गर्दीत मोठी उसळी दिसून आली आहे. समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेल्या 11 मारुतींपैकी अकरावा मारुती याच बेटावर आहे, त्यामुळेही भाविकांचा मोठा ओढा येथे पाहायला मिळतो.
एस.टी. महामंडळाने भाविकांसाठी विशेष सेवा सुरू केल्या असून, 11 मारुती दर्शनासाठी सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेषतः महिला आणि कुटुंबांसाठी या सोयी लाभदायक ठरत आहेत.
निसर्गसौंदर्य आणि ‘प्री-वेडिंग’ फोटोशूटसाठी आकर्षण
रामलिंग बेट परिसरात सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे येथे निसर्गसौंदर्याची उधळण पाहायला मिळते. हीच गोष्ट लक्षात घेऊन सिनेसृष्टीतील निर्माते आणि छायाचित्रकारांचाही बेटाकडे कल वाढला आहे. ‘प्री-वेडिंग’ फोटोशूटसाठी हे ठिकाण तरुणाईसाठी नवे आकर्षण ठरत आहे.
रामलिंग बेट हे केवळ धार्मिक स्थळ नसून, निसर्ग आणि पर्यटनाचा संगम असलेले ठिकाण बनले आहे. त्यामुळे पर्यटक आणि श्रद्धाळूंसाठी ही पर्वणीच ठरत आहे!
रामलिंग बेटावर कसे याल ?
इस्लामपूर मार्गे बहे ते रामलिंग बेट.
कोल्हापूर मार्गे येवलेवाडी ते दंड भाग व रामलिंग बेट.
कराड मार्गे रेठरे कारखाना, नरसिंहपूर ते रामलिंग बेट.