सातारा : शिवनगर येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६५ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. या हंगामात कृष्णा कारखान्याने १२ लाख ३९ हजार मे. टन ऊसाचे यशस्वी गाळप केले आहे.
कृष्णा कारखाना कार्यस्थळावर चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थितीत कारखान्याचा सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाचा सांगता सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक बाजीराव निकम, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, अविनाश खरात, धोंडीराम जाधव, प्रभारी कार्यकारी संचालक पंडित पाटील, मनोज पाटील, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, वाळवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासाहेब पाटील, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, यावर्षी आपण संचालक मंडळ, शेतकरी सभासद, तोडणी वाहतूकदार, कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने हा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गाळप केले आहे. कृष्णा कारखान्याल्या ऊस पुरवठा करण्यास शेतकऱ्यांचे प्राधान्य राहिले, ही कृष्णा कारखान्याच्या चांगल्या कामाची पोचपावती आहे. सहकारी साखर कारखान्यात आपण दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गाळप केले आहे. आपण अतिशय चांगला गाळप पार पाडला. साखर उतारा चांगला आहे. व्हिएसआयचा कृष्णा कारखान्यास आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. कारखान्याची सर्वागीण प्रगती झाली आहे. येणारा गळीत हंगामही लवकर सुरू करून यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करूया.
व्हाईस चेअरमन श्री. जगताप म्हणाले, सर्वांच्या प्रयत्नाने यावर्षी चांगले गाळप केले आहे. चेअरमन डॉ. सुरेशबाबांचा कारखान्याला राज्यात सर्वोत्तम संस्था बनविण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने कारखान्याची वाटचाल सुरू आहे.
यावेळी स्वागत व प्रस्ताविक करताना कारखान्याचे सेक्रेटरी सिद्धेश्वर शीलवंत यांनी गळीत हंगामाचा आढावा सादर केला. ते म्हणाले, चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४-२५ च्या गळीत हंगामात १०८ दिवसात १२ लाख ३९ हजार ८ मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे. तसेच १४ लाख ५२ हजार ६५७ क्विंटल साखर पोती उत्पादित केली आहेत आणि सरासरी साखर उतारा १२.५७ टक्के इतका राहिला आहे.
प्रारंभी जे. डी.मोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमित्रा मोरे यांच्या हस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी ऊसतोडणी वाहतूकदार, शेती विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला शेतकरी सभासद, ऊसतोडणी वाहतूकदार, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उसविकास अधिकारी पंकज पाटील यांनी आभार मानले.