मुंबई : महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असल्याचा आरोप केला जात आहे. या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. यावेळी विरोधकांच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले.
या योजनेसंदर्भात आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतून चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अजित पवारांनी लाडकी बहिणी योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. ‘लाडकी बहीण आता आमची झाली आहे. त्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात. लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत. मात्र ही योजना बंद करणार नाही, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. तर ‘लाडकी बहीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो.’ असेही पवारांनी नमूद केले आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, या योजनेसाठी पुरेसा निधी निश्चितपणे देऊ, हा विश्वास बहिणींना देत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. योजनेतून दरमहा १५०० रुपयांची थेट रोख रक्कम महिलांना मिळत आहे. महिला सक्षमीकरणाचं एक मोठ पाऊल शासनाने उचलले आहे.
लाडकी बहिण योजनेच खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक १० ते २५ हजारापर्यंतची कर्ज देणार आहे. राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत.
ज्या महिलांना छोटा, मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी लाडकी बहिण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढावी.म्हणजे, ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाउल पुढे टाकण्याचे आवाहन त्यांनी केले. सुमारे 45 हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून महिला सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं, मोठं योगदान मिळणार असल्याचेही पवारांनी नमूद केले आहे.