सांगली : शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी नसून, काही नेत्यांचेच हात ओले करण्यासाठी आहे, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. या महामार्गामुळे कृष्णा-वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांना पूराचा मोठा धोका निर्माण होणार असून, हा एक शेतकरीविरोधी प्रकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इस्लामपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा उचलून धरला.
८०२ किलोमीटर लांबीच्या शक्तिपीठ महामार्गासाठी ८६ हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एका किलोमीटर रस्त्यासाठी ३० ते ३५ कोटी रुपये खर्च करत असताना, या महामार्गाच्या एका किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल १०८ कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन आहे. जो महामार्ग ३५ हजार कोटींमध्ये पूर्ण होऊ शकतो, तो ८६ हजार कोटींमध्ये करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे तब्बल ५० हजार कोटींचा घोटाळा यातून होणार असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
शेतकऱ्यांना वाटत आहे की, महामार्गासाठी त्यांच्या जमिनीला भरघोस मोबदला मिळेल. मात्र, सरकारने पूर्वीचा जमीन अधिग्रहण कायदा बदलला असून, आता बाजारभावाच्या फक्त दुप्पट मोबदला मिळणार आहे. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळाला होता. पण आता या महामार्गासाठी पूर्वीच्या तुलनेत फक्त ४० टक्केच रक्कम मिळणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.
या महामार्गासाठी सरकार एक रुपयाही खर्च करणार नाही. खाजगी कंपन्यांकडून भांडवल उभे करून हा महामार्ग बांधला जाणार आहे. मग जर शेतकऱ्यांच्या जमिनीच सरकारचे भांडवल असतील, तर शेतकऱ्यांनाही टोलमधून उत्पन्न मिळायला हवे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नेत्यांचे हात ओले होणार, शेतकरी मात्र अडचणीत
या महामार्गामुळे काही नेत्यांचेच हात ओले होतील, पण कृष्णा-वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. महामार्गावर होणाऱ्या पुलांच्या भरावामुळे पूरस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, भागवत जाधव, शिवाजी पाटील, प्रकाश देसाई, बाबासाहेब सांद्रे तसेच संदीप राजोबा, जगन्नाथ भोसले, तानाजी साठे, उत्तम पाटील, शहाजी पाटील, प्रभाकर पाटील, भुषण वाकले, शिवाजी मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम्ही शक्तीपीठसाठी एकत्र…पुढे सविस्तर बोलेन
शक्तीपीठ मार्गासाठी मुंबईमध्ये आझाद मैदानावर मोर्चा काढला होता त्यावेळी जयंत पाटील यांनी आपली स्तुतीसुमने केली होती यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की ह्या विषयावर नंतर बोलु हा राजकीय विषय नसून शेतकर्यांचे आम्ही यासाठी एकत्र येऊ मी सविस्तर नक्कीच बोलेन.