Last Updated on 22 Feb 2025 4:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर येथील ‘आविष्कार’ चा २३ व्या संगीत महोत्सव
‘मनोरंजनाची हास्य यात्रा’मधील कलाकारांनी इस्लामपूरकर कला रसिकांना खळखळून हसविले
सांगली : महाराष्ट्रातील जनतेला ‘हास्य यात्रे’ च्या माध्यमातून लोटपोट हसविणारे समीर चौघुले, प्रसाद खांडेकर,नम्रता संभेराव, चेतना भट, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, प्रभाकर मोरे, दत्तू मोरे, प्रथमेश शिवलकर या कलाकारांनी इस्लामपूरकर कला रसिकांना तीन तास खळखळून हसविले… त्यांच्या साथीला होते, युवा गायक स्वप्नील गोडबोले, मुग्धा कराडे यांचे सुमधुर गायन, प्रसिध्द नृत्यांगना मिरा जोशी यांचा भन्नाट नृत्याविष्कार आणि सिने अभिनेते पुष्कर श्रोत्री यांचे ओघवते सूत्रसंचालन… रसिकांनी विनोद,गाणं आणि नृत्याचा त्रिवेणी संगम अनुभवला आहे. येथील आविष्कार कल्चरल ग्रुपने २३ व्या संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी ‘मनोरंजनाची हास्य यात्रा ‘या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी मंत्री आ.जयंत पाटील, दिलीप पाटील, तसेच हजारो कला रसिकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
हरहुन्नरी कलाकार समीर चौघुले व चेतना भट यांची कॉफी हाऊसमधील पहिली भेट, तसेच खेळ पैठणीचा या किस्स्याने रसिकांना पोट धरून हसविले. प्रसाद खांडेकर यांनी नम्रता संभेराव,वनिता खरात यांच्यासाठी आणलेला बंपर सेल अफलातून झाला. तर प्रथमेश शिवलकर या शिक्षकाची दत्तू मोरे या विद्यार्थ्यांबद्दल प्रभाकर मोरे,रसिका वेंगुर्लेकर या आई-वडिलांची तक्रार हसविणारी होती.
युवा गायक स्वप्नील गोडबोले,मुग्धा कराडे यांनी श्रीगणेशाने कार्यक्रमाची सुरुवात केली. तर गर्जा महाराष्ट्र माझा या राज्य गीताने समारोप केले. दरम्यान त्यांनी राधा ही बावरी, मला वेड लागले आदी मराठी गाणी सादर केली. प्रसिद्ध नृत्यांगना मिरा जोशी यांच्या चंद्रासह इतर लावण्यावर बहारदार नृत्याविष्कार झाला. सिने अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी अत्यंत प्रभावीपणे कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. याप्रसंगी निर्माते सुनिल नारकर (अमेरिका) उपस्थित होते.

आ.जयंत पाटील यांच्या हस्ते ‘हास्य जत्रा’ टीममधील सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला. आ.पाटील म्हणाले, जीवनातील ताण-तणाव,दुःखामुळे माणूस हसणे विसरला आहे. मात्र ‘हास्य जत्रा’टीम राज्यातील जनतेसह जगातील मराठी जनतेला मनमुराद हसवित आहे. याप्रसंगी दिलीपराव पाटील यांच्या हस्ते आविष्कारच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राजारामबापू सहकारी बँकेचे प्रा.शामराव पाटील यांच्या हस्ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. नूतन अध्यक्ष प्रा.कृष्णा मंडले यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषणात कला रसिकांच्या अखंड पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती धोडमिसे, शशिकांत शिंदे, उद्योजक अनंत चितळे, स्मिता चितळे, नेताजीराव पाटील, विनायक पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पवार, अरुणाकाकी पाटील, धैर्यशिल पाटील, शशिकांत पाटील, संजय पाटील, डॉ.संजय हरदास, सर्जेराव यादव, आर.डी.माहुली, एस.डी.कोरडे, विकास कर्डीले यांच्यासह वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यातील ६ हजारच्यावर कला रसिकांनी कार्यक्रम एन्जॉय केला.

आविष्कारचे प्रमुख मोहन चव्हाण, अध्यक्ष प्रा.कृष्णा मंडले, कार्याध्यक्ष भूषण शहा, उपाध्यक्ष इंजि.राजेंद्र माळी, सचिव विजय लाड, संचालक संतोष पाटील, प्रा.प्रदीप पाटील, सुनिल चव्हाण, इंजि.सतिश पाटील, नजीर शेख, डॉ.अतुल मोरे,विश्वनाथ पाटसुते, विजय नायकल, विश्वास कदम, हर्षवर्धन घोरपडे, सौरभ सावंत,श्रेयस पाटील,अजय थोरात,सूरज कचरे,आप्पा जावीर,तसेच आविष्कारच्या कार्यकर्त्यांनी सुंदर आयोजन केले.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 11 Mar 2026 5:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit ईश्वरपूर । बहे (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.धनश्री विष्णू थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे... Read more












































































