मुंबई । हायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या एकूण २३७ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले.
यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, उदय सामंत, धनंजय मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, विनय कोरे, प्रसाद लाड उपस्थित होते. तसेच, केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन, भाजप नेते विजय रूपाणी देखील उपस्थित होते.
दरम्यान, राजभवनात दाखल होण्यापूर्वी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. त्यानंतर, हे तिन्ही नेते सत्ता स्थापनेसाठी एकाच गाडीतून राजभवनाकडे रवाना झाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी आपण पाठिंबा देत असल्याचं पत्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतल्या सर्व घटक पक्षांनी राज्यपालांना दिलं, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांनी दिलेल्या वेळेनुसार, उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता, महायुती सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर होणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. इतर मंत्र्यांच्या शपथविधीबद्दलचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद या केवळ तांत्रिक बाबी आहेत. आम्ही तिघेही महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित काम करणार आहोत, असंही फडणवीस यांनी सांगितलं. आपण स्वत: एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे. त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे, असं फडणवीस म्हणाले. महायुतीला मोठा जनादेश मिळाला आहे. केंद्र सरकारचीही आम्हाला साथ आहे. आम्ही एकत्रितपणे राज्याच्या विकासासाठी काम करु असं अजित पवार यांनी सांगितलं. अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नावाची शिफारस मुख्यमंत्री पदासाठी केली होती. आज आपण त्यांच्या नावाची शिफारस केली, याचा विशेष आनंद आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत, आपल्याला काय मिळतं यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळेल, याचा विचार आम्ही करतो आहोत, असं शिंदे म्हणाले. अडीच वर्ष एकत्रितपणे महाराष्ट्रासाठी महायुतीनं ऐतिहासिक काम केलं असं सांगत शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही, याबद्दल संध्याकाळपर्यंत सांगू, असंही ते म्हणाले.
भाजप विधिमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
दरम्यान, तत्पूर्वी भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीस यांनी निवड करण्यात आली. पक्षाचे केंद्रीय निरिक्षक निर्मला सितारामन, विजय रूपाणी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे, अशोक उईके मेघना बोर्डीकर, योगेश सागर, संभाजी पाटील-निलंगेकर, गोपीचंद पडळकर, दिलीप गोडसे, आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले. गट नेता पदासाठी केवळ फडणवीस यांच्या नावाचाच प्रस्ताव आला. अन्य कोणत्याच नावाचा प्रस्ताव नसल्याचे सांगतानाच विजय रूपाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात येत असल्याची घोषणा केली. तत्पूर्वी, भाजप विधिमंडळ कार्यालयात पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. पक्षाचे केंद्रीय निरिक्षक निर्मला सितारमन, विजय रूपाणी यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. या बैठकीस देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखेपाटील, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, अमर साबळे आदी नेते उपस्थित आहेत.
साभार: प्रसार भारती