‘स्वाभिमानी’ चे राजारामबापू तसेच हुतात्मा कारखान्यांना निवेदन
सांगली । स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २५ ॲाक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये गळीत हंगाम सन २३-२४ गळीत हंगामातील २०० रूपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम २०२४-२५ च्या ३७०० रूपयाच्या प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असून वरील मागणीबाबत साखर कारखानदारांनी येत्या १५ दिवसात तातडीने मार्ग काढावा. अन्यथा साखर कारखान्यांना तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. दरम्यान, वाळवा तालुक्यातील राजारामबापू तसेच हुतात्मा कारखान्यांना याबाबतचे निवेदन आज, मंगळवारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समक्ष भेटून दिले.
सोलापूर जिल्ह्यातील १०.८० रिकव्हरी असणा-या कारखान्याने ३५०० रूपये पहिली उचलीचा दर जाहीर केलेला आहे. तर १२ ते १२.३० टक्के रिकव्हरी असणा-या साखर कारखान्यांना तोडणी वाहतूक वजा जाता ३७०० रूपये पहिली उचल जाहीर करण्यास काहीच अडचण नाही. येत्या १५ दिवसात जर काही निर्णय झाला नाही तर शासन व साखर कारखानदार यांना तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागणार असून या आंदोलनाने झालेल्या नुकसानीस संघटना जबाबदार नसल्याचे स्वाभिमानीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
राजारामबापू तसेच हुतात्मा कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देताना ॲड. एस. यु. संदे, शिवाजीबापू मोरे, शहाजी पाटील, दिलीप पाटील, अरुण कवठेकर, बाबासो आडमुठे, गाणी मुल्ला, जगन्नाथ भोसले, पांडुरंग सिसाळ, शामराव जाधव, अशोक सलगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा – ऊस दराच्या तोडग्यासाठी तातडीने बैठक घ्या; शेतकरी संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
निवेदनातील मागण्या अशा :
१. गळीत हंगाम सन २०२३-२०२४ गळीत हंगामातील २०० रुपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम २०२४-२०२५ च्या हंगामासाठी ३७०० रुपयाच्या प्रतिटन पहिली उचल देण्यात यावी
२. चालू गळीत हंगामामध्ये साखर कारखान्यांनी पहिल्या ५० दिवसात कार्यक्षेत्रातीलच ऊस गाळप करावा.
३ पुरामध्ये बाधीत झालेल्या ऊसाची प्राधान्याने पहिल्यांदा तोड करण्यात यावी.
४. ऊस तोडणी मजुरांची मजूरी वाढूनही व तोडणी वाहतूक एफआरपी मधून कपात करूनही ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून एकरी ५ ते १० हजार रुपयांची मागणी केली जात आहे. यामुळे अशा पद्धतीने लूट करणा-या संबधित तोडणी वाहतूकदार यांचेवर कड़क कारवाई करण्यात यावी.