बहेचे सुरेश मोहिते यांच्यासह नामवंत कवी उपस्थित राहणार
पुणे । मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून सुरू झालेली अक्षरयात्री साहित्य संमेलनाची चळवळ ग्रामीण भागातून आता विश्व साहित्य संस्कृतीकडे झेपावली आहे. अक्षरयात्री प्रतिष्ठानचे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन गतवर्षी नेपाळ येथील दुतावासामध्ये संपन्न झाले होते. २५ भाषांतील बहुभाषिक मान्यवर साहित्यिकांनी यामध्ये आपल्या सहभाग नोंदविला होता. अक्षरयात्री प्रतिष्ठानचे २६ वे भारत – श्रीलंका विश्व साहित्य संमेलन पुणे येथे गुरुवार, २१ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये दिमाखात संपन्न होत आहे.
या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी इरोशनी गलहेना, सरचिटणीस, सबुद्धी संघटना, श्रीलंका या असून प्रमुख पाहुण्या श्रीलंकेतील आरुमुगम निरोमी या आहेत. या संमेलनाचे उद्घाटन प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष सुनिताराजे पवार, प्रमुख कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या आहेत.
या संमेलनातील कवी संमेलनअध्यक्ष पद डॉ . निलिमा गुंडी उपप्राचार्य एस. पी. कॉलेज पुणे या भूषविणार आहेत. चिंतक रानसिंह श्रीलंका येथील केरानी विद्यापीठाचे सिन्हाल विभाग प्रमुख हे “श्रीलंकन कविता व तिची वैशिष्ट्ये ” या विषयावर शब्दसंवाद साधणार आहेत. यावेळी निमंत्रित मान्यवरांचे कवी संमेलन आयोजित केले असून यामध्ये श्रीलंकेतील ११ व भारतातील २१ मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. सिंहली भाषेतील कवितेचे इंग्रजी भाषांतर यावेळी श्रीलंकेतील साहित्यिक सादर करतील. भारतीय भाषेत या कवितेचा अनुवाद केला जाईल. भारतीय भाषेतील मराठी कविता इंग्रजी व सिंहली भाषेत भाषांतरित करून ती पुस्तक रूपाने प्रसिद्ध केली जाईल.
या संमेलनासाठी बालिका ज्ञानदेव दहिवडी, आशा खरतडे – डांगे छत्रपती संभाजीनगर, डॉ.अमरसिरी विक्रमारात्ने भाषा विभाग प्रमुख, कला आणि संस्कृती , दक्षिण पूर्व विद्यापीठ श्रीलंका,भरत दौंडकर निमगाव ,सुरेश मोहिते बहे, डॉ. प्रदीप गुणसेना इंग्रजी विभाग प्रमुख बौद्ध आणि पाली विद्यापीठ श्रीलंका, प्रा .डॉ . प्रीती शिंदे – पाटील वारणानगर, मृणालिनी कानेटकर पुणे, चिंतक रानसिंह सिन्हाल विभाग, केरानी विद्यापीठ, श्रीलंका, देवा झिंजाड गारखिंडी, डॉ. शुभा लोंढे पुणे, प्रियांत बंदारा नॅशनल कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीलंका, राहुल काळे राजेवाडी, प्रा. डॉ . गिरिजा शिंदे सातारा, उपुल गुरुगे संपादक श्रीलंका, अस्मिता चांदणे पुणे, थमिरा मंजू संस्थापक सबुद्धी संघटना श्रीलंका, डॉ. स्मिता पाटील मोहोळ, कविता करंजकर- जमाले धाराशिव, डॉ. प्रसाद पिटिगलआराच्ची, सर्जन, कँडी, श्रीलंका, जोत्स्ना चांदुगडे पुणे, अंजली ढमाळ सातारा, थुशान निसानसन वरिष्ठ कार्यकारी, सब्बुद्धी संघटना, श्रीलंका प्रा. डॉ. विलास पाटील जिंतूर, सांदुन जयवर्धन वन्यजीव छायाचित्रकार श्रीलंका, निसर्गाराजे शिंदे जेजुरी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची वेळ सकाळी ११ ते २ अशी असून सर्व साहित्यिक रसिकांनी या विश्व साहित्य संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.ज्ञानेश्वर मुळे संस्थापक अध्यक्ष विश्व साहित्य संस्कृती चळवळ भारत व डॉ . स्वाती शिंदे – पवार महासचिव विश्व साहित्य संस्कृती चळवळ भारत यांच्या वतीने करण्यात येत आहे.