Last Updated on 05 Nov 2024 5:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार के.पी. पाटील उमेदवारी करत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आज आदमापुर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी थेट महायुती सरकारवर हल्लाबोल केला. कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं. बाळू मामांचे आशीर्वाद घेतले. आता तुमचं दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. तुमचा उत्साह पाहिल्यानंतर हा राधानगरी मतदारसंघ गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही यात शंका नाही, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.
‘खोके सरकारला भस्म करण्याचा क्षण आता आला आहे.’, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. यासोबत लाडकी बहीण योजना, महागाई, भाजप आणि महायुतीवर उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाषण करताना सांगितले की, ‘तुमच्या मनात एक राग आहे. हा राग गेली अडीच वर्षे आपल्या मनात धगधगत ठेवला होता. खोके सरकारला भस्म करण्याचा क्षण आता आला आहे. कोल्हापूरच्या विजयाची जबाबदारी आता सतेज पाटील यांच्याकडे देतो. मी माझ्यासाठी लढत नाही तर महाराष्ट्रासाठी लढतोय. मी त्यांच्याबरोबर जाऊ शकलो असतो. त्यांना ५० खोके दिले. मी जर अख्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर गोदाम कमी पडले असते. पण गद्दारी माझ्या रक्तात नाही.’
मोदी-शहांवर निशाणा
निवडणुकीत हिंदू मुस्लिम करायचे तोडफोड करायची. मराठी माणसात फूट पाडायची,. तुम्ही मेला तरी चालेल, तुम्हाला सत्ता मिळाली पाहिजे ही भाजपची नीती आहे. गेल्यावेळी निवडून दिले, तू तिकडे गेला. लाचार झाला. पण आता राधानगरीकर लाचार होणार नाही. महाराष्ट्र विकणाऱ्यांना मदत करेल तो महाराष्ट्राचा शत्रू. जो अदानी, शहांना मदत करतो तो महाराष्ट्राचा शत्रू. जो मोदी आणि शाह यांची पालखी वाहतो तो महाराष्ट्राचा विरोधक, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सतेज पाटलांवर के.पी. पाटलांच्या विजयाची जबाबदारी
या सभेत काँग्रेस नेते सतेज पाटील उपस्थित होते. काल कोल्हापूरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सतेज पाटील यांनी आपल्या जवळ बोलावले. सतेज पाटील उद्धव ठाकरेंच्या जवळ जाताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्यावर राधानगरी विधानसभा मतदारसंघातून के पी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी देखील सोपवली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आताची लढाई महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी आहे. आज मी साथ मागायला आलो आहे. तुम्ही माझ्यासोबत लढायला तयार आहात का? प्रचाराचा नारळ आई अंबाबाईचे दर्शन घेऊन करतो. बाळूमामा यांचं दर्शन घेऊन तुमचे दर्शन घेतोय. राधानगरीची जनता गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही. मी उमेदवारी दिली, मान सन्मान दिला, प्रेम दिले. सगळे देऊन शिवसेनेसारख्या आईवर वार कसा काय करू शकतो? सतेज पाटील सोबत आहेत हे मला आणखी बरे वाटले. इथल्या विजयाची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर टाकतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.










































































