मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून मुंबईकरांना आनंदाची बातमी दिली आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर आज रात्री 12 वाजल्यापासून मोटारींना म्हणजेच कारला मोफत प्रवेश देण्यासाठीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड-एलबीएस, आनंदनगर टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या टोलमाफीची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही.
या निर्णयाचा फायदा जवळपास 80 हजारांहून अधिक हलक्या वाहनांना होणार आहे. सध्या या पाचही टोल नाक्यांवरून 45 आणि 75 रुपये इतका टोल वसूल करण्यात येतो. हे टोलनाके 2026 पर्यंत सुरू असणार होते.