Last Updated on 10 Oct 2024 5:39 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आज मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचे स्थान असणाऱ्या उद्योगपतीपैकी एक रतन टाटा होते.
टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त सोमवारी आलं होतं. त्यानंतर रतन टाटांनीच त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली होती. वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचं टाटांकडून सांगण्यात आलं होतं. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आलं. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईतील टाटा या पारशी कुटुंबात झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईत झालं. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी न्यूयॉर्क सिटीतील रिव्हरडेट कंट्री शाळेत घेतलं. सुरुवातीच्या काळात ते टाटा एअरलाइन्स आणि टाटा इंडस्ट्रीजमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडत होते. 1991 ते 2012 या काळात त्यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी लीलया पेलली.ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते. 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला होता. 1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार टाटा मोटर्सने बनवली. त्यानिमित्ताने रतन टाटा यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पनाही त्यांना सुचली.
टाटांच्या मार्गदर्शनात 2008 मध्ये रतन टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली. त्यांनी 2012 मध्ये टाटा सामूहाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आणि सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला. मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी ते आले. नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन आहेत.
रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. उद्योगाला सेवाभावी वृत्तीची झालर असलेला उद्योगपती होणे दुर्मीळ असल्याने रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांचा जीवनप्रवास एक आदर्श आहे, याचे कारण असे की रतन टाटा यांनी समाजसेवेत मोठा सहभाग घेतलेला आहे. रतन टाटा यांचे योगदान कधीही विसरण्यासारखे नाही.
रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय उद्योगविश्वार मोठी शोककळा पसरली आहे. देशासाठी आदर्श व्यक्तिमत्व, शालिन उद्योगपती अशी रतन टाटा यांची ओळख होती. त्यांच्या उद्योगविश्वातील तत्त्वे ही तरुण उद्योजकांसाठी आदर्श आहेत आणि ती कायम राहतील अशा भावना युवा उद्योजक व्यक्त करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की, श्री रतन टाटा एक दूरदर्शी व्यापारी नेते, दयाळू व्यक्तीमत्त्व आणि विलक्षण व्यक्ती होते. त्यांनी भारतामधील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना नेतृत्व प्रदान केलं. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहेत. ओम शांती!
“देशावरील संकटावर मात करण्यासाठी…”, शरद पवारांकडून रतन टाटांना श्रद्धांजली
ज्येष्ठ नेते शरद पवारांनी देखील रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. पवारांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”
जगाने अनमोल रत्न गमावले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली
निखळ मानवता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटीची उद्योजकता यांचा दुर्मीळ मिलाफ अमुल्य असे रत्न म्हणता येईल असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे जगाने गमावले आहे. भारतीयांच्या मनातील अढळ मानबिंदू अस्ताला जाणे धक्कादायक आहे.अशी शोकमग्न प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पद्मविभूषण रतन टाटा आपल्या कर्तृत्वाने अजरामरच राहतील. पण त्यांचे अस्तित्व हे
आधुनिक भारतीय उद्योग जगतासाठी आधारवड ठरले होते, असे नमूद करून मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, टाटा या नावावरील विश्वास रतन टाटा यांनी आणखी दृढ केला.
टाटा परिवाराचे आणि मुंबईचे नाते अतूट राहीले आहे. रतन टाटा यांनी मुंबईवरही भरभरून प्रेम केले. मुंबईसाठी ते नेहमीच भरीव योगदान देत आले आहेत. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक, लोक कल्याणकारी उपक्रमाला ते नेहमीच पाठबळ देत आले आहेत. रतन टाटा यांच्याकडे उद्योजकतेची विशाल दृष्टी होती. त्यातही मानवता हा केंद्रबिंदू होता,हे त्यांच्याशी संवाद साधताना लक्षात येत राहायचे. मीठापासून ते विमानापर्यंतचा उद्योग, व्यवसाय करताना रतन टाटा यांनी मातीशी, मानवतेशी असलेल्या नात्यात कधीही अंतर येऊ दिले नाही. त्यांच्या नावाप्रमाणेच जगाने एक अमुल्य असे रत्न गमावले आहे.रतन टाटा हे नाव संपूर्ण देशाला सकारात्मक ऊर्जा देणारे, बळ देणारे होते. ते उद्योग विश्वाचे शिरोमणी होते. उद्योजकांच्या पिढ्यांना त्यांनी दीपस्तंभासारखे मार्गदर्शन केले. सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय याचे रतन टाटा हे सर्वोत्तम उदाहरण होते.
भारतासाठी आणि साहजिकच महाराष्ट्रासाठी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे निधन अपरिमित अशी हानी आहे. अशा या महान भारत सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दिवंगत टाटा यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्ववर चरणी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

भारतीय उद्योजक जगताचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा हरपला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रतन टाटा यांना श्रद्धांजली
“उद्योगपती रतन टाटा हे भारतीय उद्योगक्षेत्राचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा होते. टाटा उद्योगसमुहाला आंतरराष्ट्रीय उंची, सन्मान, प्रतिष्ठा, विश्वासार्हता मिळवून देतांना देशाचा गौरव वाढवण्याचं काम त्यांनी केलं. सचोटी, प्रामाणिकपणाने उद्योग क्षेत्रात यश मिळवता येतं हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करुन दाखवलं. संकटकाळात देशवासियांच्या मदतीला धावून येणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा उद्योगसमुह म्हणून टाटा उद्योगसमुहाला देशभक्तीचं प्रतिक बनवण्यात ते यशस्वी ठरले. सर्वसामान्य भारतीयांचं कारचं स्वप्न त्यांनी ‘नॅनो’ कारच्या माध्यमातून पूर्ण केलं. टाटा उद्योगसमुहाचे संस्थापक नुसेरवानजी, जमशेटजी टाटा यांचा उद्योग, व्यापार, सामाजिक कार्य, देशभक्तीचा वारसा त्यांनी यशस्वीपणे पुढे नेला. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम, आदर, आपुलकीचं स्थान निर्माण करणाऱ्या रतन टाटा साहेबांचं निधन ही भारतीय उद्योगजगताची मोठी हानी आहे. टाटा परिवार आणि रतन टाटा साहेबांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. रतन टाटा साहेबांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.










































































