मेथी ही अत्यंत पौष्टीक आणि आरोग्यदायी पालेभाजी. यात बरेच औषधी गुणधर्म असतात. तुम्ही घरीच मेथीची लागवड करू शकता. आजकाल पालेभाज्या सांडपाण्यावर पिकवल्या जातात. त्यामुळे त्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू लागल्या आहेत. म्हणूनच तुम्हाला घरच्या मेथीची चव चाखता येईल.
- मेथीची लागवड करण्यासाठी पसरट कुंडी किंवा कंटेनर घ्या. त्यात माती घाला. कुंडी किंवा कंटेनरच्या खाली छोटी छिद्र पाडा. माती ओली करून घ्या.
- आता या मातीवर मेथीदाणे पसरा. तुम्ही घरातल्या मेथीदाण्यांचा वापर करू शकता किंवा बाजारातूनही त्यांची खरेदी करता येईल. आता या बियांवर मातीचा एक थर द्या. मेथीदाणे पाव इंचांपेक्षा जास्त आत असू नयेत.
- या टप्प्यावर कुंडीत बर्यापैकी पाणी घाला. साधारण दोन दिवसांनी मेथीला कोंब फुटू लागतील. मेथीला नियमित पाणी घाला. कंटेनर सूर्यप्रकाशात ठेवा. फार प्रखर सूर्यप्रकाश टाळा.
- मेथी उष्ण वातावरणात अधिक चांगल्याप्रकारे वाढते. मेथीच्या वाढीसाठी 10 अंश ते 32 अंश तापमानाची गरज असते.
- तुम्हाला मेथी दाणे हवे असतील तर उन्हाळ्याच्या सुरूवातीला किंवा वसंत ऋतूत बिया पेरा. अन्यथा मेथीची लागवड कधीही करता येईल.
- साधारण 15 दिवसांची मेथीची कापणी करता येईल. कापणी करताना मेथी मुळापासून उखडा आणि मूळं कापून टाका किंवा काही दिवस थांबून वरून पानांचा भाग कापून घ्या. देठं तशीच ठेवा. साधारण पंधरा दिवसांनी पुन्हा मेथीची वाढ होईल.