भाद्रपद मास : सरला श्रावण भादवा आला …
या महिन्याच्या पौर्णिमेजवळ चंद्र पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात असतो म्हणून या महिन्याला भाद्रपद असे म्हणतात.पूर्वी या महिन्याला नभस्य असेही म्हटले जात होते.
शुक्ल पक्षात गौरी गणपती आनंदउत्सव आणि कृष्ण पक्षात पितरांचे महालयश्राद्ध असते म्हणून हा महिना अतिशय महत्त्वाचा आहे.
1) हरितालिका तृतीया
सखी सहित पार्वती अर्थात उमा व शिव यांचे पूजन केले जाते .चांगला पती मिळावा ह्या इच्छेने व्रत विशेषत :कुमारिकानी करावे,परंतु हे सौभाग्य व्रत असल्याने सौभाग्य प्राप्तीसाठी विवाहित स्त्रियांनी सुद्धा हे व्रत करावे.
सूर्योदयापासून मध्याह्न समाप्तीपर्यंत म्हणजे अंदाजे दुपारी दीड वाजेपर्यंत कोणत्याही वेळी हरितालिका पूजन करावे.पूजनाच्या वेळी तृतीय तिथी पाहिजे असे नाही.
2) गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थी दिवशी पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही.प्राप्त : कालापासून मध्यांह्मपर्यंत म्हणजे अंदाजे दुपारी दीड पर्यंतआपल्या सोयीने कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते.या साठी विशिष्ट नक्षत्र,योग,विष्टी करण इत्यादी वर्ज नाहीत म्हणून ते पाहू नयेत.
गणेश मूर्ती वीतभर उंचीची आसनस्थ असावी.
उजवी सोंड डावी सोंड याला महत्त्व नाही कारण समर्थ रामदासानी म्हटले आहे “सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ”
गणपतीची मूर्ती त्याच दिवशी आणली पाहिजे अशी नाही त्या अगोदर आठ ते पंधरा दिवस ही आणून ठेवू शकता.
आपल्या रूढीप्रथेनुसार दहा,दीड,पाच,सात दिवस गणपती पूजन करून विसर्जन करता येईल.
घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करता येते .अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीचे आहे.
कोणत्याही धातूच्या मोठ्या मूर्तीचे उत्सव मूर्ती म्हणून पूजन करता येईल आणि आरास करता येईल .पाण्यात विसर्जन मात्र लहान मूर्तीचे करावे आणि धातूची श्री गणेश मूर्ती पुन: शोकेसमध्ये ठेवून द्यावी.
3) ऋषिपंचमी
सजस्वालेच्या स्पर्शास्पर्शाच्या दोषाचे निवारण व्हावे म्हणून महिला हे व्रत करतात. तसेच इतर पापदोष निवारणार्थ स्त्री-पुरुष दोघेही व्रत करतात व्रतामध्ये सप्तर्ष व अरुंधती याचे पूजन केले जाते. या दिवशी व्रतकर्त्याने नांगरलेल्या जमिनीतून उत्पन्न झालेले धान्य खाऊ नये असे शास्त्र आहे.
4) जैन संवत्सरी
मध्याह्मकालव्यापीनी भाद्रपद शुक्ल पंचमीच्या दिवशी जैन संवत्सरी करावी यामध्ये चतुर्थी आणि पंचमी पक्ष असे दोन प्रकार आहेत.
5) गौरी (महालक्ष्मी ) पूजन
भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून,ज्येष्ठा नक्षत्राच्या दिवशी गौरी पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते.
काही प्रांतात सप्तमीचे दिवशी आवाहन अष्टमीला गौरी पूजन करून नवमीला विसर्जन केले जाते.
7) अनंत चतुर्दशी
अनंत चतुर्दशी हे काम्यव्रत असून गतवैभव परत मिळावे. यासाठी हे वृत्त चौदा वर्षे केले जाते काहीजण 14 वर्षे झाल्यावर व्रताचे उद्यापन करतात आणि काहीजण पुढे कुलाचार म्हणून करीत राहतात.या व्रतामध्ये अनंत शेष व यमुना या देवतेचे पूजन करून अनंताचा दोरा धारण केला जातो.हे व्रत श्रीकृष्णाने युधिष्ठेला सांगितले होते.
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती उत्सव सार्वजनिक स्वरूपाचा केल्याने, अनंत चतुर्दशीला उत्सवाचे स्वरूप आले आहे . वास्तविक हा दिवस अनंत पूजन व्रताचा आहे.
8) पितृपक्ष महालय श्राद्ध
प्रतिसावंत्सरिक श्राद्ध म्हणजे दरवर्षी एकाच मृत व्यक्तीला उद्देशून केले जाते.
उदा. मुलगा जीवंत असेपर्यंत मृतआई, वडिलांच्या त्या त्या मृत्यु तिथी ला हे श्राद्ध केले जाते.
परंतु भाद्रपद कृष्ण पक्षात केले जाणारे महालय श्राद्ध हे वडिलांचे वर्ष श्राद्ध झाल्यावर आपल्या संबंधित सखे नातेसंबंधातील सर्व पितरांना उद्देशून केले जाते.
थोडक्यात प्रति सांवत्सरिक श्राद्ध म्हणजे मृत झालेल्या एकाच व्यक्तीसाठी बोलवून दिले जाणारे भोजन आणि महालय श्राद्ध म्हणजे आपल्या संबधीत मृत झालेल्या सर्व व्यक्तींना एकत्र बोलवून एकाच वेळी दिल जाणारे सार्वजनिक भोजन.
भाद्रपद मास
(दिनांक 4 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 )
मुहूर्त………………………………………………………..
हरितालिका पूजन
शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024
दुपारी दीड पर्यंत
गणेश चतुर्थी
शनिवार दिनांक 07 सप्टेंबर 2024
गणेश स्थापना प्राप्त : काळापासून दु . 01.30 पर्यंत
ऋषिपंचमी
रविवार दिनांक 8 सप्टेंबर 2024
गौरी आवाहन
दिनांक 10 सप्टेंबर 2024
रात्री 08 वा .04 मि . पर्यंत
गौरी पूजन
बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024
दिवसभर
गौरी विसर्जन
गुरुवार दिनांक 12 सप्टेबर
2024
रात्री 9.53 पर्यंत
महालय आरंभ
बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024
सर्वपित्री दर्श अमावस्या
बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024
सर्व पित्री अमावस्या या मासाचे सांगता होते .
शुभंभवतु ।
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)