इस्लामपूर येथील माझ्या गावचा धडा कार्यशाळेस शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद!
सांगली । माझ्या गावचा धडा सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा लिखित सांस्कृतिक दस्तऐवज बनेल. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात गावच्या मातीबद्दलची श्रद्धा अधिक दृढ होईल. हा प्रकल्प निश्चितच राज्याला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांनी केले .
इस्लामपूर येथे वाळवा पंचायत समितीच्या वतीने, शिक्षक बँकेच्या सभागृहात, आयोजित माझ्या गावचा धडा या कार्यशाळेत शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाळवा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार होते .
तालुक्यातील शंभर प्राथमिक शिक्षक या कार्यशाळेत सहभागी झाले. सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून आणि प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, माझ्या गावचा धडा हा पायलट प्रोजेक्ट संपूर्ण सांगली जिल्ह्यात राबवला जात आहे.
यावेळी गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार म्हणाले, या प्रकल्पामुळे शिक्षक परिसराबद्दल, गावाबद्दल आणि इथल्या समाजाबद्दल विविध विषयात लेखन करतील. त्यामुळे आपल्या परिसराचा शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक वारसा जतन केला जाईल.
यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी डॉ. विमल माने यांनी हा प्रकल्प कसा राबवायचा आहे, याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. या प्रकल्पास एससीईआरटीने मान्यता दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी छाया माळी यांनी केले. येलूर केंद्राचे उपक्रमशील केंद्रप्रमुख सुधाकर पाटील,
जागर शिक्षणाचा प्रणेते दीपक रोकडे , संदीप पाटील यांची भाषणे झाली. आभार विस्ताराधिकारी संजय पाटील यांनी मानले.
यावेळी विस्ताराधिकारी सुनील आंबी, विषयतज्ञ महेश पाटील, प्रसाद हसबनीस, आयेशा नदाफ, दिलीपकुमार मोरे, अशोक पाटील, सुनील गुरव, चंद्रकांत पाटील यासह तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.