रायगड । लोकसभा निवडणूक सन २०२४ च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने केलेल्या कारवाईत रायगड जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दिनांक १६ मार्च ते २२ एप्रिल २०२४ पर्यत एकूण २५७ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून २५६ आरोपीना अटक करण्यात आलेली आहे असे आर आर कोले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी सांगितले.
संपूर्ण कारवाईमध्ये १ लाख १२ हजार ८७२ लिटर दारु व १३ वाहने जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रुपये ७१ लाख ८६ हजार ८४१ आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण १४५ गुन्हे नोंद करण्यात येवून ४५ लाख ३९ हजार ४१५ रुपये किंमतीचा मुद्देमाल व मावळ मतदारसंघात एकूण ११२ गुन्हे नोंद करण्यात आलेले असून रुपये २६ लाख ४७ हजार ४२६ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 149 खाली एकूण ५९६ संशयित व सराईत गुन्हेगारांना नोटीस बजाविण्यात आलेली आहे.
अवैध मद्याच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत व्यक्ती विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम ९३ अंतर्गत एकूण २२१ प्रस्ताव लोकसभा मतदारसंघातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आलेले असून पैकी १२३ कलम-९३ अंतर्गत बंधपत्र करुन घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्यामुळे रायगड जिल्हयात एकूण १० मद्यविक्री अनुज्ञप्त्या पुढील आदेश होईपर्यत निलंबित करण्यात आलेल्या आहेत.
लोकसभा निवडणुक-२०२४ आचारसंहिता कालावधीत या विभागाची ७ पथक तैनात असून पथकांस आंतरराजीय मद्य तस्करी होणार नाही तसेच बेकायदेशीर हातभट्टी दारु निर्मिती व विक्री केंद्र यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होणार याकरीता रायगड जिल्हयात शेडूंग, ता-खालापूर, खारपाडा, ता-पेण व चांदवे, ता-पोलादपूर येथे ३ तपासणी नाके उभारण्यात आलेले असून तेथे संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे, हॉटेल, टप-या यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत आहे. तसेच सदर निवडणूक कालावधीत गोवा राज्यातून गोवानिर्मित मद्याची चोरटी वाहतूक रेल्वे प्रशासनाच्या रो-रो सेवेव्दारे वाहतूक होण्याची शक्यता असल्याने कोलाड येथे रो-रो रेल्वे सेवेव्दारे येणा-या वाहनांची पोलीस विभाग व रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय साधून तपासणी करण्यात येत आहे.
रायगड जिल्हयात लोकसभा निवडणुक २०२४ आचारसंहिता कालावधीत सर्व मद्य उत्पादक घटक, ठोक विक्री व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीवर प्रभावी नियत्रंण ठेवण्याकरीता अनुज्ञप्त्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. तसेच सदरचे कंट्रोल रुम जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वीत करण्यात आलेले आहे.
३२ रायगड मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनास आल्यास तसेच अवैध मदय निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉटस अँप क्र. ८४२२००११३३ व टोल फ्री क्र.१८००२३३९९९९ व अधीक्षक कार्यालय रायगड येथील दुरध्वनी क्रमांक ०२१४१-२२८००१ वर संपर्क साधण्यांत यावा असे आवाहन सर्व नागरीकांना करण्यात आले आहे.