प्रत्येक वर्षी सर्वसाधारणपणे माहे एप्रिल, मे व जून या महिन्यामध्ये तापमान वाढल्याने उष्माघाताचा प्रादूर्भाव होत असतो. उष्माघाताने बाधीत व्यक्ती वर प्रतिबंधक उपाय व उपचार न केल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
उष्माघात होऊ नये यासाठी आतापासून जागरुक राहिले पाहिजे. रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रस्तरावर प्रथमोपचार व उष्माघात नियंत्रणाच्या अनुषंगाने आवश्यक औषधी व साहित्य सामग्री सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.
नागरीकांनी उष्माघाताबाबत सजग रहावे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा,असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
त्यासाठी उष्माघाताची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक व प्राथमिक उपचारांची माहिती करुन घेऊ या.
■ उष्माघात होण्याची कारणे
१. उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फारवेळ करणे.
२. कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे.
३. जास्त तापमाणाच्या खोलीमध्ये काम करणे.
४. घट्ट कपड्यांचा वापर करणे.
अशाप्रकारे प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा वाढत्या तापमानाशी सतत संबंध आल्यामुळे उष्माघात होतो.
लक्षणे
१. थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे.
२. भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे.
३. रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी.
प्रतिबंधक उपाय
१. वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. (दुपारी १२ ते सायं. ४ पर्यंत)
२. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावीत.
३. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे) वापरु नयेत, सैल व पांढऱ्या रंगाचे कपडे
वापरावेत.
४. जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपुर प्यावे. सरबत प्यावे.
५. उन्हामध्ये काम करताना अधून-मधून सावलीत थोडीशी विश्रांती घ्यावी.
६. उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम थांबवावे खाली नमूद केल्या प्रमाणे उपचार घ्यावेत.
७. उन्हात बाहेर जाताना डोळ्यावर गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा वा उपरणे यांचा वापर करावा.
■ उपचार
१. रुग्णास हवेशीर खोलीत तसेच पंखे, कुलर्स सुरु करुन किंवा वातानुकुलीत खोलीत ठेवावे.
२. रुग्णांचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.
३. रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी.
४. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात, आईसपॅक लावावे.
५. आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने शीरेवाटे सलाईन देणे.
६. उन्हामुळे त्रास जाणवल्यास आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी तात्काळ संपर्क साधून औषधोपचार घ्यावा.
साभार…………………………
डॉ. अभय धानोरकर
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर
Post Views: 512