सांगली । विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून आष्टा महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जात आहेत.इनडोअर स्पोर्ट्स हाॅल मध्ये अधुनिक बॅडमिंटन कोर्ट ,बास्केटबॉल कोर्ट,टेबल टेनिस, कॅरम,तसेच आठशे मीटर ट्रॅक ,क्रिकेट ग्राउंड, फूटबॉल ग्राउंड सर्व सोयीनीयुक्त स्टेडियम या सुविधांबरोबर उत्कृष्ट प्रयोगशाळा,र्व्हरचूल क्लासरुम या ही सुविधा देण्यात येत आहेत, असे प्रतिपादन प्राचार्य आर.डी.सावंत यांनी केले.
आष्टा दि.कासेगाव शिक्षण संस्थेचे, आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आष्टा येथे ग्रंथालय विभागाकडून ‘क्यू.आर.कोड संच बोर्ड’चे उद्घाटन संस्थेचे सचिव मा. प्राचार्य डॉ.आर.डी.सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले ग्रंथालयाच्या या सुविधेमुळे विद्यार्थी व शिक्षकांना एका क्लीकवर अनेक गोष्टीं उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कमी वेळेत विविध विषयातील नियतकालिके, विभिन्न पुस्तके, विषयनिहाय अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका संच, ई-संसाधने, शोधनिबंध तसेच महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती सामाजिक माध्यमाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या क्यू.आर.कोड च्या मदतीने ‘बोलके झाड’ या अनोख्या उपक्रमाची सुरुवातही यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलवर क्यू.आर.कोड स्कॅन केल्यानंतर प्रत्येक झाडाची वैविध्यपूर्ण माहिती ध्वनी स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या क्यू.आर.कोड द्वारे ग्रंथालयाची वेबसाईट विद्यार्थ्यांना सहजपणे हाताळता येणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमामध्ये होणाऱ्या बदलाची माहिती विद्यार्थी तसेच शिक्षकांना क्यू.आर.कोड च्या माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहे. हल्ली युट्युब, इंस्टाग्राम व फेसबुक यासारख्या समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात वापर होत असतो तेव्हा अशा समाजमाध्यमांवर देखील विद्यार्थींच्या ज्ञानार्जनस सहाय्यभूत अशा अनेक नवनवीन अध्ययन घटकांचा समावेश या क्यू.आर.कोड च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनास प्रोत्साहित करण्याच्या महाविद्यालयाच्या प्रयत्नांचे यावेळी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. आर. डी. सावंत यांनी कौतुक केले.
यावेळी सहसचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र कुरळपकर, ग्रंथपाल प्रियांका बारपटे , शिक्षक ,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.