Last Updated on 01 Jan 2024 7:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
एका बाजूला निवडी करायच्या आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे हात बांधून ठेवायचा धूर्त मंडळींचा उद्योग
सांगली । गावाच्या सर्वांगीण विकासात सरपंच,उपसरपंच तसेच सदस्य समितीबरोबर महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या गावपातळीवरील विविध समित्यांचे अस्तित्व आता फक्त कागदावरच दिसत आहे.ग्रामीण भागात अनेक ठिकाणी समित्यांच्या निवडी होत आहेत.पण,दुसऱ्याबाजूला त्यांचे हात बांधून ठेवायचा उद्योग राजकारणातील काही धूर्त मंडळी करताना दिसतात.समित्यांचे अस्तित्व कागदावर न राहता गावाच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समित्यांतील पदाधिकाऱ्यांनी योगदान देणे तितकेच महत्वाचे आहे.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. त्या माध्यमातून शासनाकडून दरवर्षी गावखेड्यांना लाखो रुपयांचा निधी दिला जात आहे. गावाच्या सर्वांगीण विकासात ग्रामपंचायतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ग्राम विकासात ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्य समितीची भूमिका महत्वाची आहे. गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांचा सहभागही तितकाच महत्वाचा असतो.पंचायत राज कायद्यात अभिप्रेत असलेल्या सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या उद्देशाने या समित्या नियुक्त केल्या जात असतात.
गावपातळीवरील या समित्या…
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती,संयुक्त वन व्यवस्थापन समिती,शालेय व्यवस्थापन समिती,ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती,बाल विवाह प्रतिबंधक कायदा समिती,आपत्ती व्यवस्थापन समिती,कर आकारणी समिती,सामाजिक लेखापरीक्षण समिती,ग्राम बाल संरक्षण समिती,लाभार्थी स्तर उपसमिती,ग्राम दक्षता समिती,जैव विविधता व्यवस्थापन समिती,ग्राम कृषी विकास समिती अशा विविध समित्या नियुक्त केल्या जात असतात.गावाच्या शाश्वत विकासासाठी या समित्या महत्वपूर्ण योगदान देवू शकतात.पण,दुर्दैवाने ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये विविध समित्या केवळ नाममात्र उरल्या आहेत.
समित्यांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष,सदस्य हे नावापुरतेच
अनेक गावांतील समित्यांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष,सदस्य हे नावपुरतेच आहेत.त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन समित्यांची फेररचना करणे आवश्यक आहे.त्याचबरोबर रिक्त असलेल्या जागा त्वरित भरून समितीला बळकटी द्यावी,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.अलीकडच्या काळात अध्यक्ष, सदस्यांच्या निवडीत गावपातळीवर राजकारण सुरू झाले.प्रतिष्ठेसाठी सदस्य होत आहेत.त्यांच्यासाठी पद शोभेची वस्तू ठरत आहे.त्यामुळे गावासाठी झोकून देवून काम करण्याची मानसिकता आता कमी होताना दिसत आहे.काही ठिकाणी समित्या करण्यात आल्या.पण,काही ठराविकच लोकांची सत्तेत मक्तेदारी असल्याने समित्यांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष,सदस्य हे नावापुरतेच राहतात.निवडी करायच्या पण कोणतेही काम या समित्यांना करू द्यायचे नाही किंवा त्यांच्या कामात खोडा घालण्याचा उद्योग सत्तेतील मक्तेदार करताना दिसतात.एका बाजूला निवडी करायच्या आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे हात बांधून ठेवायचा उद्योग राजकारणातील काही धूर्त मंडळी करताना दिसतात.
तंटामुक्त गाव समित्या इतिहासजमा ?
गावगाड्यातील तंट्याचा निपटारा गावातच व्हावा.गावखेड्यातील नागरिकांनी पोलिस ठाणे,न्यायालयाची पायरी चढू नये,पोलिस यंत्रणेवरील कामाचा ताण कमी व्हावा तसेच गावातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत व्हावी यासाठी गावागावात तंटामुक्त समित्या स्थापन केल्या.मात्र,सुरवातीच्या काळातील या समित्यांचा उत्साह आता कमी झाला आहे.आता या समित्यांचे सक्षमीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.गावातील वाद,तंटे आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत.परिणामी समित्यांच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.यानिमित्ताने समित्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.अनेक गावांतील तंटामुक्त समित्यांचे अध्यक्ष,सदस्य हे नावापुरतेच आहेत.काही ठिकाणी तर समित्याच इतिहासजमा झाल्याचे दिसून येत आहे.










































































