Last Updated on 16 Dec 2023 9:17 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आपल्या शेत जमिनीचा पोत दिवसेंदिवस खराब होत चालला असून शेतीची उत्पादक क्षमता झपाट्याने कमी होत आहे. गावोगावी क्षारपड जमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपल्या शेत जमिनीचा पोत कायम राखण्यासाठी,तो अधिक वाढविण्यासाठी आपण ऊसाची पाचट जाळू नका,ती शेतातच कुजवा,असे आवाहन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक दादा पाटील यांनी केले.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने “ऊस गेल्यानंतर पाचट जाळू नका,पाचट जमिनीतच कुजवा आणि जमिनीचा पोत वाढवा”ही मोहीम हाती घेतली असून इस्लामपूर,आष्टा शहरासह वाळवा तालुक्यातील अनेक गावात जन जागृती फलक लावले आहेत.या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,खरेदी समितीचे अध्यक्ष देवराज पाटील,शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील,जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रतिकदादा पाटील पुढे म्हणाले,ऊस गेल्यानंतर पाचट न जाळता त्याचे सरीत आच्छादन करायला हवे. त्यामुळे खोडव्याची उगवण क्षमता ८२ टक्के राहते. एक हेक्टर ऊस क्षेत्रातून ७ ते १२ टन पाचट तयार होते. प्रतिटन पाचटातून ५.४ किलो नत्र,१.३ किलो स्फुरद,३.१ किलो पालाश आणि अन्य सूक्ष्म मूलद्रव्ये मिळतात. तसेच तण नियंत्रणाचा खर्च कमी येतो आणि सेंद्रीय कर्ब वाढल्या मुळे शेतात गांडुळांची संख्या वाढते. इतके फायदे पाचट न जाळल्याने होत असताना आपण पाचट का जाळतो? आपण पुढच्या पिढीसाठी जमिनी व्यवस्थित ठेवल्या नाहीत,तर पुढची पिढी आपणास माफ करणार नाही.
यावेळी संचालक बाळासाहेब पवार,रघुनाथ जाधव,बबनराव थोटे,प्रतापराव पाटील,दिलीपराव देसाई,रमेश हाके,शैलेश पाटील, अतुल पाटील,हणमंत माळी, राजकुमार कांबळे,सौ.मेघा पाटील,डॉ. योजना शिंदे-पाटील,वैभव रकटे,रामराव पाटील यांच्यासह शेती विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी आभार मानले.
प्रतिकदादांच्या कामाचे स्वागत आणि कौतुक
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी तालुक्यातील शेती ओलिताखाली आणण्याचे स्वप्न पाहिले आणि ५० हजार एकराचे पाणी परवाने घेतले. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी गावोगावी पदयात्रा काढून शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व पटवून सांगितले आणि कारखाना पुरस्कृत ३३ पाणी पुरवठा संस्था उभारून ५० हजार एकर क्षेत्र ओलिता खाली आणले. यातूनच तालुक्याच्या प्रगतीस खऱ्याअर्थाने मोठी चालना मिळाली. आता प्रतिकदादा पाटील हे क्षारपड जमिनी दुरुस्ती आणि जमिनीचा पोत सुधारण्याची मोहीम राबवित आहेत,याचे शेतकरी वर्गातून स्वागत आणि कौतुक होत आहे.








































































