Last Updated on 15 Nov 2023 6:53 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ऊसदर प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून आज तिसऱ्यादिवशी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बहे (ता. वाळवा) कृष्णानदी पुलाजवळ कृष्णा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक करणारी वाहने रोखून धरली आहेत.त्यामुळे बहे-कृष्णा कारखाना रस्त्यावरील वाहतूक कोलमडून पडत आहे.शनिवारपासूनच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे.ऊसाने भरलेले एकही वाहन कारखान्याकडे जाऊ नये यासाठी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी रात्रभर जगता पहारा ठेवला आहे.
जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेले ऊसदर आंदोलन चिघळले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठीकठिकाणी ऊस वाहतूक रोखून धरली आहे.काही वाहनांच्या टायरमधील हवा सोडली जात आहे.तर काही ठिकाणी ऊस तोडी बंद पाडल्या जात आहेत.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेती अधिकाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत.संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कालपासून अनेक ठिकाणी ऊसाने भरलेली वाहने रोखून धरली आहेत.मागील हंगामातील 400 रुपये आणि चालू हंगामातील 3 हजार 500 रुपये दर मिळावा यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम असून संघटनेने सोमवारपासून अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे.
बहे पुलाजवळही गेल्या तीन दिवसांपासून स्वाभिमानाने आंदोलन सुरु केले आहे.कृष्णा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक करणारी वाहने रोखून धरली जात आहेत.संघटनेच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तांबवे गावचे शिवाजी पाटील,भागवत जाधव,शहाजी पाटील,सर्जेराव पाटील,शंकर पाटील,संतोष शेळके,प्रविण पाटील,प्रदीप पाटील,मालोजी शिंदे यांच्यसह अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मंगळवार सकाळपासूनच ठिय्या मांडला आहे.ऊस वाहतूक करणारे प्रत्येक वाहन रोखून धरले जात आहे.शनिवारपासून ऊस वाहतूक करणारे सुमारे 25 ट्रॅक्टर 22 बैलगाड्या रोखुन धरल्या आहेत.

शनिवारी रात्री इस्लामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय हारुगडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे आदी पोलीस अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.पण तो निष्फळ ठरला.गत वर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा.चालु ऊसाला 3500 रूपये मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.ऊसाने भरलेले एकही वाहन कारखान्याकडे जाऊ नये यासाठी रात्रभर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडून जागता पहारा ठेवला आहे.
संघटनेतील माणुसकी…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बहे पूल येथे ऊसाची वाहने अडवण्यात आली आहेत.शनिवार सकाळपासून ऊसाची भरलेले ट्रॅक्टर,बैलगाड्या सर्वच वाहने रोखण्यात आली आहेत.आंदोलन करताना जेवणाची सोय म्हणून तांबवे गावातून शनिवारी रात्री जेवून घेऊन लोक आले.यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांसोबतच थांबलेले ट्रॅक्टर ड्रायव्हर,बैलगाड्यांचे मालक सर्वांनाच जेवण दिले आणि माणुसकीचे दर्शन घडवले.आमचा लढा हा गोरगरीब ट्रॅक्टर ड्रायव्हर,बैलगाडी मालक यांच्याबरोबर नाही तर आमचा लढा हा शासन आणि कारखानदार यांच्याबरोबर असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी दाखवून दिले.
यावर्षी साखर कारखान्यांनी साखर 3600 रूपये पुढे प्रति क्विंटल भावाने विक्री केली आहे,उपपदार्थ भाव चांगला असताना जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आडमुठेपणाची भुमिका सोडावी,मागील तुटलेल्या ऊसाचे पैसे जमा करावेत अन्यथा संघर्ष अटळ आहे.
भागवत जाधव
स्वाभिमानी शेतकरी संघटना












































































