नवी दिल्ली । चांद्रयान -3 ची कक्षा कमी करुन ते चंद्राच्या अधिक जवळ नेण्याचा दुसरा टप्पा आज यशस्वी झाला.यापुढचा टप्पा येत्या बुधवारी 16 ऑगस्ट रोजी होणार आहे.इस्रोने या महिन्याच्या 9 तारखेला यान चंद्राच्या कक्षेजवळ आणण्याचा एक प्रयत्न यशस्वीपणे पार पाडला होता.
चांद्रयान-3 हे गेल्या महिन्याच्या 14 तारखेला प्रक्षेपित करण्यात आले.आणि 5 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या कक्षेत दाखल झाले.17 ऑगस्टपर्यंत लँडर आणि रोव्हरचा समावेश असलेले लँडिंग मॉड्यूल,प्रोपल्शन मॉड्यूलपासून दूर जाईल.यानंतर,चंद्रावर अंतिम उतरण्यापूर्वी लँडरवर डी-ऑर्बिटिंगचे प्रयत्न केले जातील. इस्रो 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे.यामुळे अमेरिका,रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश असेल.