Last Updated on 13 Aug 2023 2:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई | विद्यार्थ्यांना गुणवत्ता व नाविन्यपूर्ण शिक्षण आणि संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू केले आहे.या धोरणानुसार एआयसीटीई मान्यताप्राप्त व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी सलग्नित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदल करुन शैक्षणिक वर्ष 2023 -24 पासून सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मंत्री श्री. पाटील म्हणाले,भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. राज्यात तंत्रशिक्षण विभाग नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. सध्याच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करुन शैक्षणिक वर्ष 2023 -24 पासून प्रथम सत्र प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा पाठ्यक्रम लागू करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण सहा सत्रांचा अभ्यासक्रम डिसेंबर 2025 पर्यंत टप्या-टप्प्या पूर्णपणे विकसित करण्यात येईल.
तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर म्हणाले,नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तंत्र शिक्षण अभ्यासक्रमात करण्यात येत आहे.49 एआयसीटीई मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रमांकरिता प्रथम सत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. त्याला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ ‘के’ स्कीम या नावाने संबोधले जाणार आहे. हा अभ्यासक्रम क्रेडिट सिस्टीमवर आधारित असणार आहे. यात प्रत्येक सत्र हे 20-22 क्रेडिटचे आहे. सहा सत्रांचा पदविका अभ्यासक्रम हा 120-132 क्रेडिटचा असणार आहे. औद्योगिक प्रशिक्षणात पूर्वीच्या अभ्यासक्रमात असलेला सहा आठवड्यांचा कालावधी 12 आठवड्यांचा करण्यात येणार आहे. डिजिटल मीडियाचा प्रभावी उपयोग करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमात अंतर्भाव असणार आहे.
विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लावण्यासाठी त्याचे मूल्यांकन होणार आहे. मल्टीपल एन्ट्री-मल्टीपल एक्झिटची तरतूद करण्यात येत आहे.उन्नत महाराष्ट्र अभियानातील उद्देशानुसार प्रादेशिक गरजांचा अभ्यास करून तंत्रज्ञानावर आधारित योजनांवर काम करण्याच्या दृष्टीने अभ्याक्रमात विशेष समावेश करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधीही अधिक उपलब्ध होणार आहेत,असे डॉ. विनोद मोहितकर म्हणाले.






































































