जगभरातील अनेक देश पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह सातत्याने अंतराळात सोडत असतात. या उपग्रहांचे काम पूर्ण झाले किंवा ते निकामी झाले तर त्याचे पुढे काय केले जाते, ते कुठे ठेवले जातात याचे उत्तर अनेकांनी माहिती नाही. याचे उत्तर असे आहे की द. पॅसिफिक महासागरात एका रिमोट जागी हे उपग्रह दफन केले जातात. या ठिकाणाला स्पेसक्राफ्टची दफनभूमी असेच नाव आहे. पॉइंट नेमो नावाने हे स्थान ओळखले जाते. समुद्रात दुरवर असलेल्या या जागेपासून जवळच्या जमिनीचे अंतर १४०० नॉटीकल मैल आहे.
क्लासिक सायफाय नॉवेल ‘२०,००० लीग्ज अंडर द सी’ मधील कॅरेक्टर डीप सी डायविंग कॅप्टनच्या नावावरून हे नाव दिले गेले आहे. नासाच्या मते या ठिकाणी अंतराळातून कचरा पडण्याची शक्यता १० हजारात एक इतकी कमी आहे.
या ठिकाणी महासागरात चार किमी खोल, जुने, निकामी उपग्रह, इंधन टाक्या व कचरा टाकला जातो. येथे सूर्य किरणे पोहोचू शकत नाहीत. १९७१ पासून उपग्रह या जागी दफन केले जात आहेत. गेल्या ४० वर्षाच्या काळात १६०-३०० उपग्रह येथे डंप केले गेले आहेत. यात सर्वाधिक उपग्रह रशियाचे आहेत. रशियाचे स्पेस स्टेशन ‘मीर’ २००१ मध्ये येथेच टाकले गेले आहे. तीन वर्षानंतर सध्याचे अंतराळ स्टेशन काम पूर्ण करेल तेही येथेच दफन केले जाईल असे समजते.