नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना पितृशोक
सांगली : चिखलहोळ (ता.खानापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त विक्रीकर सहआयुक्त अशोकराव शांताराम पाटील (वय ७१) यांचे रविवारी सकाळी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांचे ते वडील होत.
विक्रीकर विभागात त्यांनी सुमारे ३५ वर्षे सेवा बजावली. सन २०१० ला ते विक्रीकर सहआयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर शासनाने पुन्हा त्यांना तीन वर्षासाठी विक्रीकर विभागात पॅनलवर काम करण्याची संधी दिली. अत्यंत शांत, मनमिळावू व मितभाषी म्हणून ते परिचित होते. सेवानिवृत्तीच्या कालखंडानंतर त्यांनी सामाजिक कामात स्वत:ला झोकून दिले.
चिखलहोळ येथे तुळजाभवानी मंदीर उभारणीसह अन्य विकास कामांत त्यांनी मोठे योगदान दिले.विक्रीकर सहआयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी गावात शेती सांभाळली.परंपरागत शेती व्यवसायाला फाटा देऊन त्यांनी आधुनिक शेती करीत तरूणांना प्रोत्साहन दिले.
गेल्या एक ते दीड महिन्यांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांच्यावर पुणे येथील दिनानाथ रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांचे रविवारी सकाळी निधन झाले.
पाटील हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व उद्योजक भगतदादा पाटील यांचे निकटवर्तीय होते.उच्च विद्याविभूषित असलेल्या पाटील यांनी सुरवातीच्या काळात इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काहीकाळ काम केले होते.त्यादरम्यान,राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विक्रीकर विभागाच्या सेवेत रुजू झाले.या कालावधीत त्यांनी पुणे,कोल्हापूर,मुंबई,औरंगाबाद आधी ठिकाणी मोठ्या पदावर काम केले होते.काहीकाळ त्यांनी वकिलीही केली होती.सेवानिवृत्तीनंतर ते पुणे येथे वास्तव्यास होते.