Last Updated on 30 May 2023 7:31 AM by Sanjay Patil/Adhorekhit
संक्षिप्त
171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॉनवे आणि ऋतुराज या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात केली.यानंतर रहाणे आणि रायुडूने मधल्या फळीत आश्चर्यकारक कामगिरी केली.शेवटी जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा करत चेन्नईला पाचव्यांदा चॅम्पियन बनवले.
रवींद्र जडेजा ठरला हिरो! MI च्या विक्रमाशी केली बरोबरी
जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत केल्या 10 धावा
रहाणे-रायडू चमकले, शेवटच्या दोन चेंडूत जडेजाने गुजरातकडून सामना हिसकावला

अहमदाबाद | IPL 2023 च्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने दणदणीत विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला.चेन्नई सुपरकिंग्सने गुजरातचा पराभव करून पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्या आयपीएल हंगामात विजेतेपद आपल्याकडे राखता आले नाही.


अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम सामना रंगला.चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल व वृद्धिमान साहा या जोडीने संघाला पुन्हा एकदा अर्धशतकी सलामी दिली.गिलने 39 तर साहाने 54 धावांचे योगदान दिले.मात्र, गुजरातच्या डावाचा नायक युवा साई सुदर्शन हा ठरला. त्याने 47 चेंडूवर 96 धावांची शानदार खेळी केली.त्याच्या योगदानामुळे गुजरातने 4 बाद 214 धावा केल्या.
गुजरातने विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 215 धावांचे आव्हान दिले असताना ते पूर्ण करण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्सचे फलंदाज मैदानात आले.परंतु पहिली ओव्हर सुरु होताच मैदानावर पावसाचे आगमन झाले. काहीवेळातच पाहूस थांबला परंतु पावसामुळे मैदानावरील काही भाग ओला झाल्याने सामना तब्बल २ तास उशीरा म्हणजे रात्री 12 वाजून 10 मिनिटाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामना उशिरा सुरु होत केल्याने ही मॅच 15 ओव्हरची करण्यात आली.अंतिम सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे पंचांनी सीएसकेला डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 171 धावांचे आव्हान दिले होते.
रोमांचक सामन्यात चेन्नईचा विजय
चेन्नई सुपरकिंग्सला 171 धावांचे टार्गेट मिळाले असताना पुन्हा एकदा चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कोनवेची जोडी सलामीसाठी मैदानात उतरली. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 26, डेवोन कॉनवेने 47, शिवम दुबेने 32, अजिंक्य रहाणेने 27, अंबाती रायडूने 19, तर रवींद्र जडेजाने 15 धावा केल्या.शेवटच्या दोन चेंडून 10 धावांची गरज असताना जडेजाने एक षटकार ठोकला आणि त्यानंतर चौकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला.
दुसरीकडे गुजरातसाठी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा पुन्हा एकदा चमकदार प्रदर्शन करू शकला.मोहितने आपल्या तीन षटकांमध्ये 3 विकेट्स घेतल्या. नूर अहमद याने तीन षटकात 17 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.पण,शेवटी त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले.
चेन्नई सुपर किंग्सने केली मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड हा मुंबई इंडियन्सच्या नावे होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या संघाने 5 वेळा ट्रॉफी जिंकली होती.आता चेन्नई सुपर किंग्सच्या खात्यातही 5 ट्रॉफी जमा झाल्या आहेत.चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने गुजरातला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करत मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी केली.













































































