Last Updated on 28 Mar 2023 8:29 AM by Sanjay Patil/Adhorekhit
गावाकडच्या तरुणाईच्या छोट्या स्वप्नांची मनोरंजक गोष्ट
सांगली । गावाकडच्या क्रिकेटप्रेमाची,तरुणाईच्या छोट्या स्वप्नांची मनोरंजक गोष्ट घेऊन ‘तेंडल्या` चित्रपट ५ मेला राज्यभर प्रदर्शित होणार आहे.
सचिन तेंडुलकरला लहानपणी त्याच्या शारदाश्रम शाळेतील सहकारी तेंडल्या म्हणत. सचिनचा चाहता असलेल्या निर्माता सचिन जाधव यांनी हेच नाव चित्रपटासाठी निवडले असले तरी हा चित्रपट बायोपिक नाही.आंतरराष्ट्रीय किर्ती मिळालेल्या क्रिकेटपटूकडून प्रेरणा घेऊन आपले स्वतःचे क्रिकेट खेळणाऱ्या तरुणाईची ही गोष्ट आहे.
वाळवा शिराळा तालुक्यातील शाळकरी मुले कॅमेरासमोर पहिल्यांदा येत अफलातून अभिनय करीत आहेत. सामान्य तरुणांना नायक बनवणारा हा चित्रपट ग्रामीण तरुणांच्या साध्या साध्या अपेक्षा, सुखाच्या कल्पना प्रतिबिंबित करतो.या चित्रपटाचे दोन नायक आहेत.सिनेमाच्या पोस्टरवर हातात एंटीना धरलेला एक मुलगा आहे,दुसऱ्या मुलाच्या हातात मोडकी बॅट आहे.
पहिला नायक वडाप चालक आहे. त्याचे साधे स्वप्न आहे.त्याला स्वतःच्या रंगीत टीव्हीवर सचिन तेंडुलकरला खेळताना पाहायचे आहे. इतर ठिकाणी ही संधी घेताना होणाऱ्या अपमानामुळे हा नायक त्रस्त आहे.दुसऱ्या नायकाकडे मोडकी जळालेली बॅट आहे.प्रत्येक सामन्यांमध्ये हमखास होणारा पराभव त्याला सचिन तेंडुलकर सारखी बॅट घेऊन विजयात रूपांतरित करायचा आहे.टीव्ही बघताना अँटेना हलणे,क्रिकेट खेळताना अंपायरला शिव्या, क्रीजचे वेगळे नियम, कॅचआऊटचे नियम,धावपट्टी,धावा,चौकार षटकारचे नियम,ग्रामीण प्रेक्षकांचा प्रतिसाद हे सगळं तुम्ही आम्ही अनुभवलेलं आहे.
या स्मरणरंजनाची हा चित्रपट गमतीशील पुनरावृत्ती करतो.ग्रामीण भागातील क्रिकेट संस्कृतीची धमाल विनोदी मांडणी आहे.यापूर्वी क्रिकेटची पार्श्वभूमी घेऊन झोया फॅक्टर,लगान,इकबाल,कायपोचे,एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी असे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.या परंपरेत हलक्या फुलक्या विनोदी प्रसंगांच्या माध्यमातून तेंडल्या धमाल विनोदी मांडणी करत आहे.सिनेमाच्या टिझरमध्ये द इन्स्पिरेशनल अँड कॉमिक जर्नी ऑफ टू स्पोर्ट्स फॅन असा उल्लेख आहे.
चित्रपटातील पात्रांची नावे पोप्या,इंजान,बारका.आज्या, जॅांट्या,जयसूर्या,डीपी अशी आहेत.या नावावरून देखील संभाव्य धमालीचा अंदाज येतो.सचिन तेंडुलकर,सुनंदन लेले यांनी चित्रपटाबद्दल सकारात्मक मत नोंदवले आहे.अश्वमेध मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शनाच्या टप्प्यावर आणण्यासाठी सचिन जाधव,चैतन्य काळे,नचिकेत वाईकर आणि शंभरहून अधिक शाळकरी मुलांची टीम तेंडल्या पाच वर्षाहून अधिक काळ घरदार गहाण ठेवून राबते आहे.
वाळवा-शिराळा तालुक्यात चित्रीकरण झाले.कोरोना काळामुळे प्रदर्शन रखडले तेव्हा या मुलांनी शिराळा तालुक्यात साडेचार एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन अक्षरशः भाजीपाला विकून जगण्याच्या लढाईत तग धरला.हलक्या फुलक्या प्रसंग आणि विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाचा ध्येयवाद आकाराला आला आहे.सामान्य कुटुंबातल्या सामान्य तरुणांनी आपले जीवन पणाला लावून हा असामान्य चित्रपट निर्माण केला आहे.ग्रामीण भागातील तरुणाईने निर्माण केलेला हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच गाजतो आहे. सचिन जाधव, चैतन्य काळे, सुभाष जाधव, तानाजी केसरे, नचिकेत वाईकर आणि शंभरहून अधिक कलाकार चित्रपटाच्या वातावरण निर्मितीमध्ये अहोरात्र राबत आहेत.या चित्रपटाने आपला दर्जा सिद्ध केला आहे.चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला पाच राज्यपातळीवरचे तर एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.चित्रपटाच्या वातावरण निर्मितीसाठी क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी सांगली, सातारा,कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क दौरा केला आहे.सचिन तेंडुलकर यांनी हा चित्रपट उत्कृष्ट असल्याचे मत नोंदवले आहे.
राज्यभर तेंडल्याच्या फॅन्सची संख्या वाढते आहे.अनेकांनी तेंडल्याचे पोस्टर डीपी म्हणून ठेवायला सुरुवात केली आहे.सोशल मीडियातून तेंडल्याला सपोर्ट मिळतो आहे.अनेक ठिकाणी पोस्टर्स उभारले आहेत.मुंबईत भारत ऑस्ट्रेलिया या सामन्यात दरम्यान तेंडल्याची पोस्टर स्टेडियम मध्ये झळकली. शिक्षण संस्थांमधून शिक्षक विद्यार्थ्यांच्या बैठकातून टीम तेंडल्या चित्रपटाचा आशय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडत आहे.हा चित्रपट ग्रामीण भागातील तरुणांच्या कर्तृत्वाची यशोगाथा आहे.या मुलांनी घरदार गहाण ठेवून चित्रपट निर्मितीचे स्वप्न पूर्ण केले आहे.तज्ञांनी पुरस्कार देऊन चित्रपटाचा दर्जा मान्य केला आहे.चित्रपटांच्या वडाप चालक नायकाला रंगीत टीव्ही मिळतो का ? मोडक्या बॅटने खेळणारा दुसरा नायक मॅच जिंकतो का ? या या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि ग्रामीण तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी ५ मे ला आपण आपल्या जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला पाहिजे.एक अत्यंत दर्जेदार करमणूकप्रधान आणि आपल्याला अंतर्मुख करणारा चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळेल हे नक्की !
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर











































































