Last Updated on 03 May 2022 9:16 AM by Sanjay Patil/Adhorekhit
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती
सांगली ।
सांगली जिल्ह्यातील शहरी भागातील नागरिकांना अद्यावत व व्यापक स्वरूपात आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी इस्लामपूर, आष्टा शहरासह सांगली जिल्ह्यात १७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे मंजूर केली असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांनी दिली.
इस्लामपूर शहरात सध्या आंबेडकरनगर येथे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू असून आता शिवनगर,निनाईनगर व दत्त टेकडी येथे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करीत आहोत,असेही त्यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी गेल्या वर्षांपासून मॉडेल स्कुल हा उपक्रम राबवित आहोत. त्याचा रिझल्टही मिळू लागला आहे.
जिल्ह्यात १४ हजार पटसंख्या वाढली आहे. सध्या आपण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्यावत करण्यासाठी ‘स्मार्ट पीएसी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. एखाद्या खाजगी हॉस्पिटलप्रमाणे ग्रामीण भागातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यावत करीत आहोत. ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जाळे विणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत सांगली जिल्ह्यात १७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे मंजूर केली आहेत. पुढील ५ वर्षात शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचा सोसायटीचा प्रयत्न आहे. वाळवा तालुक्या तील इस्लामपूर शहरात ३,आष्टा शहरात २,तसेच जत तालुक्यात २,कडेगांव तालुक्यात १,कवठेमहांकाळ तालुक्यात १,खानापूर तालुक्यात ४,पलूस तालुक्यात २,शिराळा तालुक्यात १, व तासगांव तालुक्यात २ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे मंजूर केली आहेत. या केंद्रांना जागा,इमारत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच या केंद्रात लागणारा डॉक्टर व इतर स्टाफ राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे राज्य व जिल्ह्यास्तरा वरून भरला जाणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप माने,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे हे संबंधितांशी पत्रव्यवहार करीत आहेत. यावेळी इस्लामपुर नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव साबळे,उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.नरसिंह देशमुख, उपस्थित होते.
स्व.बापूंच्या आठवणीस उजाळा
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागास आरोग्य सुविधा देण्यासाठी तालुक्यात प्रथम दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे मंजूर करून आणली होती. त्यातील एक आरोग्य केंद्र राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर.पाटील यांच्या कुरळपमध्ये,तर दुसरे माजी सभापती स्व.वसंतराव रकटे यांच्या बावची गावात देण्यात आले. ही दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रे ना.जयंतराव पाटील यांनी अद्यावत केली आहेत.










































































