मुंबई |
शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे. यासाठी विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सोयी सुविधा शाळांना देण्याबाबतचे निर्णय घेण्यात येत आहेत. सांगली, जळगाव, हिंगोली या जिल्ह्यांसह अन्य जिल्ह्यातही जिल्हा नियोजन समिती मार्फत आदर्श शाळांबाबत खूप चांगले काम झाले आहे. शाळांच्या सुविधेकरिता 300 कोटी रूपये देण्यात आले असून आता 54 कोटी रूपये देण्यात आले आहे. निजामकालीन शाळेसाठी 92 कोटी रूपये देण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात आदर्श शाळा निर्माण होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली.
28 ऑगस्ट 2015 अन्वये संचमान्यतेचे निकष निश्चित करण्यात आलेले होते. त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. मात्र संचमान्यतेसंदर्भात लोकप्रतिनिधी व इतर यांची सातत्याने मागणी होत असल्याने आता संच मान्यतेचे सुधारित निकष निश्चित करण्यात येतील, असे मंत्री प्रा.गायकवाड यांनी सांगितले.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री नागोराव गाणार, अभिजित वंजारी, अमरनाथ राजूरकर, गोपिचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता.